Akola Lok Sabha Results 2024 : अकाेल्यात भाजपाने गड राखला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 07:22 PM2024-06-04T19:22:43+5:302024-06-04T19:24:08+5:30
Akola Lok Sabha Results 2024 : अनुप धाेत्रेंनी राखली वडिलांच्या विजयाची परंपरा कायम; डाॅ. अभय पाटील दुसऱ्या,ॲड. आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर
राजरत्न सिरसाट
लाेकमत न्यूज नेटवर्क
Akola Lok Sabha Results 2024 : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धाेत्रे यांनी त्यांच्या वडिलांच्या विजयाची मालिका कायम ठेवत विजयश्री खेचून आणला. अंत्यत चुरशिच्या झालेल्या या लढतीत धाेत्रे यांनी काँग्रेसचे उमेदवार डाॅ. अभय पाटील यांचा ४०,६२६ मतांनी पराभव केला. डाॅ़ अभय पाटील यांनी तगडी लढत दिली. अॅड प्रकाश आंबेडकरांच्या साेशल इंजिनिअरींगचा करिष्मा यावेळीही चालला नसल्याने त्यांना या निवडणुकीत तिसऱ्या क्रमाकांची मते मिळाली.
या मतदारसंघात १९८९, १९९१ आणि १९९६ मध्ये भाजपचे स्व. पांडुरंग फुंडकर सतत तीनदा विजयी झाले होते. तो विक्रम मोडीत काढत संजय धोत्रे यांनी २०१९ च्या निवडणुकीत चाैथ्यांदा निवडून येत नव्या विक्रमाची नोंद केली हाेती. तीच परंपरा त्यांचे चिरंजीव अनुप धाेत्रे यांनी राखली आहे. संजय धाेत्रे यांनी पक्ष बांधणीवर भर देऊन जिल्ह्यात भाजपची ताकद निर्माण केली. ते सलग चार वेळा खासदार हाेते, पाचव्यांदा त्यांचे चिरंजीव अनुप धाेत्रे विजयी झाल्याने अकाेला मतदारसंघ धाेत्रेंचाच असल्याचे पुन्हा अधाेरेखित झाले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान, संजय धाेत्रे यांच्यानंतर पाचव्यांदा पुन्हा त्यांच्याच चिरंजीवाला उमेदवारी दिल्याने नकारात्मक लाट आहे, असे वातावरण निर्माण करण्यात आले होते, तथापि विरोधकांच्या या सर्व प्रकारच्या प्रचारावर मात करीत अनुप धोत्रे यांनी विजय मिळविला.
अकोला लोकसभा मतदारसंघात १८ लाख ९० हजार ८१४ मतदार असून, त्यापैकी ११ लाख ६८ हजार ३६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. २०१९ च्या तुलनेत यावेळी पार पडलेल्या निवडणुकीत मतदानात १.७३ टक्क्यांनी वाढ झाली होती. यामध्ये -------- नवीन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदारांना आकर्षित करण्यात विरोधक अपयशी ठरले. धोत्रे यांनी ४,५७,३० इतकी मते मिळवली, काॅंग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना ४,१६,४०४ अशी घवघवीत मते मिळाली. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना २,७६,७४७ इतकी मते मिळाली.
वंचित बहुजन आघाडीचे काँग्रेसच्या महाविकास आघाडीसाेबत समीकरण जुळले नसल्याने काँग्रेसने ठरल्याप्रमाणे डाॅ. अभय पाटील यांना रिंगणात उतरविले. ॲड. आंबेडकर यांनी साेशल इंजिनिअरिंगचा प्रयाेग करीत आपले मताधिक्य वाढविण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला; परंतु आंबेडकरांनी यावेळी मांडलेली वेगळी चूल पुराेगामी विचारांच्या मतदारांना रुचली नसल्याने या निकालावरून अधाेरेखित हाेत आहे. मुस्लीम मतदारांनी यावेळी काँग्रेसच्या पारड्यात झाडून मतदान टाकले. काँग्रेसने सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या महागाई, बेराेजगारी मुद्दा प्रखरतेने लावून धरला. असे असले तरी भाजप सत्तेत आल्यास भारतीय राज्यघटना बदलणार यावर रान उठवले हाेते. यामुळे आंबेडकरी, बहुजन समाजाने ॲड. आंबेडकरांऐवजी यावेळी काँग्रेसला साथ दिल्याचे या निकालावरून स्पष्ट हाेत आहे.
डाॅ. पाटील यांनी दिली कडवी झुंज
काॅंग्रेसचे उमेदवार डाॅ. अभय पाटील १५ फेरीपर्यंत आघाडीवर हाेते. त्यानंतरच्या फेरीनंतर त्यांच्या आघाडीत घट हाेत भाजपचे उमेदवार अनुप धाेत्रे यांनी आघाडी घेतली, ती शेवटच्या २८ व्या फेरीपर्यंत कायम हाेती. परंतु डाॅ. अभय पाटील निवडणुकीत नवखे असताना त्यांनी कडवी झुंज दिली.
ॲड. आंबेडकरांची मते घटली
२०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांना २,७८,८४८ मते मिळाली हाेती. या निवडणुकीत त्यांच्या मतांचा टक्का २,१०१ मतांनी घटला आहे.
संजय धाेत्रे २,७४,६५७ मतांनी घेतली हाेती आघाडी
२०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत संजय धाेत्रे यांना ५,५४,४४४ मते मिळाली हाेती. त्यांचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा २ लाख ७४ हजार ६५७ मतांची आघाडी घेत विजय मिळविला आहे.अनुप धाेत्रे यांना मात्र निवडूण येण्यासाठी संघर्ष करावा लागला़