संचारबंदीमुळे अनेकांची कुटुंबीयांपासून ताटातूट
By atul.jaiswal | Published: March 28, 2020 10:34 AM2020-03-28T10:34:45+5:302020-03-28T10:38:07+5:30
अकोला जिल्ह्यातील अनेक जण परजिल्ह्यात, तर पर जिल्ह्यातील काही विद्यार्थिनी अकोल्यात अडकून पडल्या आहेत.
- अतुल जयस्वाल
अकोला : संचारबंदीमुळे अकोला जिल्ह्यातील अनेक जण परजिल्ह्यात, तर पर जिल्ह्यातील काही विद्यार्थिनी अकोल्यात अडकून पडल्या आहेत. मूळ गावी परतण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी मिळविण्यासाठी अडकून पडलेल्या विद्यार्थिनी गत चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत; परंतु परवानगी मिळत नसल्याने त्यांच्या पदरी अखेर निराशाच पडत असल्याचे वास्तव शुक्रवारी ‘लोकमत’च्या पाहणीतून समोर आले.
जगभरात थैमान घालणाºया कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे सगळीकडे संचारबंदी लागू करण्यात आली असून, राज्य व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. बस व रेल्वेसेवासुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक जण परजिल्ह्यात अडकून पडले आहेत. अकोल्यातील काही जणांचे कुटुंब बाहेरगावी गेले आहे. तर परजिल्ह्यातील काही विद्यार्थिनींना अकोल्यात अडकून पडावे लागले आहे. ‘शुक्रवारी लोकमत चमू’ने जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी केली असता, काही विद्यार्थिनी, महिला व पुरुष निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या कक्षासमोर उभे असलेले दिसले. विचारणा केली असता, कोणी बाहेरगावी गेलेल्या पत्नी व मुलांना, तर कोणी बाहेरगावी शिकत असलेल्या आपल्या मुलीला आणण्यासाठी प्रशासनाकडून लिखित परवानगी घेण्यासाठी आल्याची माहिती समोर आली. ऋतुजा गजानन वावगे नामक महिलेने सांगितले, की त्यांची मुलगी काही दिवसांपूर्वी एका क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी औरंगाबाद येथे गेले होती. आता ती औरंगाबाद येथील वसतिगृहात एकटी असून, तिला परत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे; परंतु प्रशासनाकडून चार दिवसांपासून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
वर्धेच्या विद्यार्थिनी अडकल्या!
वर्धा येथील किरण आणि काजल वासेकर या दोन विद्यार्थिनी ‘नीट’ परीक्षेच्या शिकवणी वर्गासाठी अकोला येथे आल्या होत्या. संचारबंदीमुळे शिकवणी वर्ग बंद झाले आहेत. आता त्यांना परत घरी जायचे आहे; परंतु परवानगी मिळत नसल्याने त्या येथेच अडकून पडल्या आहेत.
पत्नी व मुले बाहेरगावी अडकले!
रोहन वानखडे यांना माहेरी गेलेली पत्नी व मुलांना परत आणण्यसाठी यवतमाळ येथे जायचे आहे. धीरज रंगवानी यांना जळगाव येथे तर कृष्णोरकर यांना जळगाव येथे जाणे गरजेचे आहे; परंतु परवानगी मिळत नसल्याने त्यांची कुटुंबीयांशी ताटातूट झाली आहे.
कोण घेणार जबाबदारी?
दुसºया शहरांमध्ये अडकून पडलेल्या कुटुंबातील सदस्यांना परत आणण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने अनेक जण तणावग्रस्त आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या कुटुंबीयांना खासगी वाहनाद्वारे आणण्याचीही त्यांची तयारी आहे; परंतु प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने ते हतबल झाले आहेत. दुसºया शहरांमध्ये अडकून पडलेल्या आपल्या मुलाबाळांची सुरक्षा कोण घेणार, असा सवालही त्यांनी केला आहे.
परजिल्ह्यात अडकून पडलेल्यांना परत आणणे गरजेचे आहे. अनेकांकडून परवानगीसाठी अर्ज येत आहेत. याबाबत विभागीय आयुक्तांसोबत चर्चा केली असून, विभागीय आयुक्तांनी या विषयी मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. शासनाकडून परवानगी मिळाली तर प्रशासनही नक्कीच परवानगी देईल.
- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी अकोला.
कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी बाहेर गेलेल्या लोकांना जिल्ह्यात येण्यापासून रोखणे गरजेचे आहे. आपत्कालीन वैद्यकीय कारणावरून आतापर्यंत एकालाच परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर कोणालाही परवानगी देण्यात आली नाही. नागरिकांनी काही दिवस सहकार्य करावे. - संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला