अकोला : अर्जुनी-मोरगाव येथे गुरुवारी मराठी संत साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:15 AM2018-02-12T02:15:41+5:302018-02-12T02:17:05+5:30
अकोला : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन गोंदिया जिल्हय़ातील अर्जुनी-मोरगाव येथे १५, १६ व १७ फेब्रुवारी २0१८ रोजी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन गोंदिया जिल्हय़ातील अर्जुनी-मोरगाव येथे १५, १६ व १७ फेब्रुवारी २0१८ रोजी होणार आहे. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यासह विविध खात्यांचे मंत्री, प्रसिद्ध संत साहित्यिक यावेळी उपस्थित राहणार आहेत. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत, तर संत तुकाराम अध्यासन केंद्राचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) यांच्या सहभागातून होणार्या या संमेलनाबाबत समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते दिंडी सोहळयाचा शुभारंभ होणार आहे. सकाळी १0 वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ होणार आहे. यावेळी संत तुकाराम अध्यासन केंद्राचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर हे गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून संमेलनाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. शनिवार, १७ फेब्रुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा सांगता समारोप व सत्कार सोहळा संपन्न होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून माणिकराव ठाकरे, उपसभापती, विधान परिषद महाराष्ट्र, दिलीप कांबळे राज्यमंत्री, सामाजिक न्याय, विजयबापू शिवतारे, राज्यमंत्री, जलसंपदा, अमरीशराज आत्राम, राज्यमंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती लाभणार आहे.
विविध पुरस्कारांचे होणार वितरण
वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र पुरस्कृत ‘वारकरी विठ्ठल पुरस्कार’ महाराष्ट्र राज्यामध्ये अमूल्य कार्य केल्याबद्दल मरणोत्तर पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जाहीर करण्यात आला असून, जनार्दन बा. बोथे, सरचिटणीस, अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ, मोझरी हे पुरस्कार स्वीकारणार आहेत.
वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी ‘जीवनगौरव पुरस्कार’ संत गाडगे महाराज मिशन नागरवाडी जि. अमरावती यांना जाहीर झाला असून, हा पुरस्कार बापुसाहेब देशमुख स्वीकारणार आहेत.