अकोला : तीन तालुक्यांतील ९० गावांमध्ये लागणार ‘मिनी हायमास्ट व एलईडी’ पथदिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:53 PM2019-09-21T13:53:17+5:302019-09-21T13:53:29+5:30
अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांतील ९० ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील गावांमध्ये ‘मिनी हायमास्ट एलईडी’ पथदिवे लावण्यात येणार आहेत.
अकोला : जिल्ह्यातील अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांतील ९० गावांमध्ये ‘मिनी हायमास्ट व एलईडी’ पथदिवे (लाइट) लावण्यात येणार आहेत. त्यासाठी ३ कोटी ३० लाख २७ हजार १२७ रुपयांच्या कामांचा कार्यारंभ आदेश (वर्क आॅर्डर) जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत संबंधित कंत्राटदारास शुक्रवारी देण्यात आला.
लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांतर्गत जिल्ह्यातील अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांतील ९० ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील गावांमध्ये ‘मिनी हायमास्ट एलईडी’ पथदिवे लावण्यात येणार आहेत. ३ कोटी ३० लाख २७ हजार १२७ रुपयांच्या या कामांसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी गत २९ आॅगस्ट रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर तीन तालुक्यांतील ९० गावांमध्ये ‘मिनी हायमास्ट व एलईडी’ पथदिवे लावण्याच्या कामांचा कार्यारंभ आदेश (वर्क आॅर्डर) जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत जळगाव येथील भूषण इलेक्ट्रिकल्स विद्युत कंत्राटदारास २० सप्टेंबर रोजी दिले. या कामाचा निधी ३१ मार्च २०२० पूर्वी खर्च करावयाचा असून, ‘मिनी हायमास्ट व एलईडी’ पथदिवे लावण्याचे काम विहित मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचेही कार्यारंभ आदेशात नमूद करण्यात आले आहे.