अकोला मनपा : मालमत्ता करवाढीच्या मुद्यावर विशेष आमसभा बोलवा - झिशान हुसेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 04:45 PM2018-01-16T16:45:04+5:302018-01-16T16:53:41+5:30
अकोला : नागरिकांवर मालमत्ता करवाढीची कुºहाड कोसळली असून आता तर महापालिकेने थेट जप्तीच्या नोटीस बजावणे सुरू केले आहे त्यामुळे या मुद्यावर सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी विशेष आमसभा बोलविण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक डॉ.झिशान हुसेन यांनी केली आहे.
अकोला : अकोला शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून सुधारित करवाढ करणाºया सत्ताधारी भाजपाने वाढीव कराच्या रकमेतून तब्बल ५५ टक्क्यांची सूट देण्याचा निर्णय आॅगस्टमध्ये झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेतला होता. सत्ताधाºयांनी शब्दांचा खेळ करून वेळ काढूपणा केला आहे. प्रत्यक्षात १५ ते २० टक्केच करवाढ कमी करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली. नागरिकांवर मालमत्ता करवाढीची कुºहाड कोसळली असून आता तर महापालिकेने थेट जप्तीच्या नोटीस बजावणे सुरू केले आहे त्यामुळे या मुद्यावर सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी विशेष आमसभा बोलविण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक डॉ.झिशान हुसेन यांनी केली आहे.
महापालिकेने मालमत्ता पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेऊन पुनर्मूल्यांकन आणि सुधारित करवाढ एकाच दमात लागू झाल्यामुळे नागरिकांच्या मालमत्ता करात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ही करवाढ संपूर्णत: रद्द करण्याची मागणी काँग्रेस व भारिप-बमसंने तर करवाढ कमी करण्याची मागणी शिवसेने केली होती. सर्वच विरोधी पक्षांचा दबाव लक्षात घेता आॅगस्ट महिन्यातील सर्वसाधारण सभेत करवाढीच्या ठरावात फेरबदल करण्याचा विषय घेतला. सर्वपक्षीय नगरसेवकांचा दबाव लक्षात घेऊन महापौर विजय अग्रवाल यांनी वाढीव कर रकमेतून ५५ टक्क्यांची सूट देणार असल्याचे स्पष्ट केले होते प्रत्यक्षात अशी सुट नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली नाही. आता तर काही प्रभागांमध्ये नागरिकांना थेट मालमत्ता जप्तीच्या नोटीस आल्या आहेत. त्यामुळे करवाढ कमी करण्यासाठी जनतेचा दबाव वाढत आहे त्यासाठी या करवाढीच्या मुद्यावर विशेष सभा बोलावून या संदर्भात फेर निर्णय घेण्याची गरज आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी यासाठी पुढाकार घेऊन विशेष आमसभा बोलविण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन डॉ.झिशान हुसेन यांनी केले आहे.
विशेष सभा बोलविण्याचा असा आहे नियम
महापालिकेची सर्वसाधरण व विशेष अशा दोन आमसभा होत असतात सर्वसाधारण सभा ही महापौर यांच्या सुचनेनुसार नियोजीत होते. तर विशेष सभा बोलविण्यासाठी एक चर्तुथांश नगरसेवकांनी मागणी करण्याची अट आहे. महापालिकेत एकूण ८० सदस्य असून त्यापैकी २० नगरसेवकांनी विशेष सभेची मागणी केली तर महापालिका प्रशासनाला १५ दिवसाच्या आत अशी सभा बोलविणे किंवा २० नगरसेवकांनी ठरविलेल्या तारखेला सभा बोलविणे बंधनकारक आहे. काँग्रेसकडे १३ नगरसेवक असून उर्वरीत ७ नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नावर पाठींबा देण्याची गरज असल्याचे डॉ.झिशान हुसेन यांनी पत्रकात नमूद केले आहे.
सर्वांनीच मागणी करण्याची गरज
मालमत्ता करवाढीमुळे त्रस्त झालेले नागरिक संपूर्ण शहरात आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी पक्षीय भेद विसरून यासाठी पुढे येण्याची गरज आहे. विशेष सभेत चर्चा करून मालमत्ता कर कमी करण्याबाबत निर्णय घेता येणे शक्य आहे. नागरिकांनीही आपल्या नगरसेवकांना यासाठी पुढाकार घेण्याकरिता आग्रह धरावा असे आवाहन डॉ.हुसेन यांनी केले आहे.