अकोला : शिवजयंतीच्या सहभागासाठी मोटारसायकल रॅली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 02:31 AM2018-02-19T02:31:13+5:302018-02-19T02:32:14+5:30
अकोला : सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी होणार्या शिवजयंतीमध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांचा सहभाग नोंदविण्यासाठी रविवारी महानगरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मोटारसायकलींवर लावलेले भगवे ध्वज आणि भगवे फेटे बांधून निघालेल्या युवक-युवतींच्या या रॅलीने अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने प्रथमच अशा प्रकारची भव्य रॅली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क

स्थानिक आकाशवाणीसमोरच्या जिल्हा परिषद कर्मचारी भवनासमोरून मोटारसायकल रॅलीस प्रारंभ झाला. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी या रॅलीचे उद्घाटन भगवे ध्वज दाखवून केले. त्यानंतर ही रॅली आकाशवाणी समोरून दुर्गा चौक, स्कायलार्क समोरून टॉवर चौक, धिंग्रा चौक, महापालिका कार्यालयाजवळून जिल्हाधिकारी कार्यालय, अशोक वाटिका जवळून तुकाराम चौक, कौलखेड, गोरक्षण मार्गावरून ही रॅली पुन्हा नेहरू पार्क चौकातून आकाशवाणीसमोरच्या जिल्हा परिषद कर्मचारी भवनात पोहोचली. सकाळी १0 वाजतापासून सुरू झालेली रॅली दुपारी १ वाजता संपुष्टात आली. भगवे ध्वज घेऊन निघालेल्या युवक-युवतींच्या मोटारसायकल रॅलीने अकोलेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. जवळपास १७00 मोटारसायकली या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
रांगोळी-पुष्पवृष्टीने रॅलीचे स्वागत
मोटारसायकल रॅलीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी रांगोळी आणि पुष्पवृष्टी करण्यात येत होती. कौलखेड परिसरात रॅलीचे जोरदार स्वागत झाले. रॅली कौलखेड परिसरात येताच फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. सोबतच २५ किलो गुलाबपुष्पाच्या पाकळ्यांची उधळण येथे सारखी सुरू राहिली. त्यामुळे रॅलीत सहभागी झालेल्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता.
माँ जिजाऊ, बाल शिवाजींचे आकर्षण
माँ जिजाऊ आणि बाल शिवाजींच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या कलावंतांनी या मोटारसायकल रॅलीची शोभा वाढविली होती. हेमलता भालतिलक या युवतीने माँ जिजाऊंची वेशभूषा केली होती.