रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी अकोला मनपाची मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 05:26 PM2018-06-07T17:26:31+5:302018-06-07T17:26:31+5:30
अकोला: शहराच्या भुजल पातळीत घसरण झाल्यामुळे नागरिकांच्या बोअर कोरड्या पडत असल्याने पाणीटंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात नव्याने बोअर खोदल्या जात असल्याचे चित्र आहे.
अकोला: शहराच्या भुजल पातळीत घसरण झाल्यामुळे नागरिकांच्या बोअर कोरड्या पडत असल्याने पाणीटंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात नव्याने बोअर खोदल्या जात असल्याचे चित्र आहे. पाण्याचा बेसुमार उपसा होत असला तरी त्याबदल्यात नागरिकांकडून जल पुनर्भरणासाठी (रेन वॉटर हार्वेस्टिंग) ठोस प्रयत्न होत नसल्यामुळे महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेऊन जनजागृती सुरु केली आहे. जनजागृतीसोबतच निर्माणाधिन इमारतींवर कारवाई करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे.
छतावरील पाण्याचे जमिनीत पुनर्भरण करण्यासाठी बोटावर मोजता येणार अकोलेकर वगळल्यास इतरांमध्ये निरुत्साह असल्याचे चित्र पाहता मनपा प्रशासनाने रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मनपातील नगररचना विभागाने २०१७-१८ मध्ये ३०२ इमारतींना बांधकाम परवानगी दिली असून निर्माणाधिन इमारतींच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले की नाही, याची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याशिवाय इमारतींना कम्प्लीशन सर्टिफिकेट न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनपाच्या दप्तरी शहरातील ७० कमर्शियल कॉम्पलेक्स, रहिवासी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले असले तरी ते जुजबी स्वरूपाचे असल्याचे चित्र आहे. जलपुनर्भरणासाठी नागरिकांमध्ये निरुत्साह असल्यानेच शहराची भुजल पातळी खालावली आहे.