महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांची पुणे येथे बदली
By आशीष गावंडे | Published: February 23, 2024 08:31 PM2024-02-23T20:31:57+5:302024-02-23T20:32:43+5:30
अकाेलेकर नवीन आयुक्तांच्या प्रतिक्षेत
आशिष गावंडे, अकाेला: महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांची राज्य शासनाने पुणे येथे बदली केली आहे. त्या पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळतील. दरम्यान, द्विवेदी यांचा बदली आदेश जारी झाल्यानंतर महापालिकेच्या रिक्त आयुक्तपदासाठी अद्यापही नियुक्ती आदेश न निघाल्यामुळे नवीन आयुक्त काेण,याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे.
महापालिकेच्या लाभलेल्या पहिल्या आयएएस महिला अधिकारी तत्कालीन आयुक्त निमा अराेरा यांची राज्य शासनाने अकाेला जिल्हाधिकारी पदी बदली केली हाेती. त्यादरम्यान, १६ सप्टेंबर २०२१ राेजी शासनाने मनपाच्या आयुक्तपदी कविता द्विवेदी यांची नियुक्ती केली. येत्या सप्टेंबर महिन्यात द्विवेदी यांना तीन वर्षांचा कालावधी पूर्ण हाेणार हाेता. द्विवेदी यांना मनपातील अनेेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा सामना करावा लागला. शासनाने बदली आदेश जारी केल्यानंतरही अधिकारी रूजू हाेत नसल्यामुळे प्रशासकीय कामकाजाचा सर्व भार आयुक्त द्विवेदी यांच्यावर आल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीतही त्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची गाडी रुळावर आणत दर महिन्याच्या ठराविक तारखेला वेतन देण्याचा निर्णय घेतला. रस्ते, नाल्या, उद्यान व इतर विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच देयक अदा करण्याच्या आयुक्तांच्या धाेरणामुळे कंत्राटदारांनी विकास कामांचा दर्जा व गुणवत्ता कायम राहील,याकडे लक्ष दिले.
आगामी लाेकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील रिक्त पदावर तातडीने नियुक्ती करण्याच्या उद्देशातून निवडणुक आयाेगाच्या निर्देशानुसार शासनाने बदली आदेश जारी केला. -कविता द्विवेदी आयुक्त,मनपा