अकोला महापालिकेच्या आयुक्तपदी संजय कापडणीस रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:24 PM2018-12-28T12:24:10+5:302018-12-28T12:24:53+5:30
अकोला: महापालिकेच्या आयुक्तपदी संजय कापडणीस रुजू झाले असून, त्यांनी गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.
अकोला: महापालिकेच्या आयुक्तपदी संजय कापडणीस रुजू झाले असून, त्यांनी गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. मनपात आल्यानंतर त्यांनी महापौर विजय अग्रवाल यांची भेट घेऊन चर्चा केली.
भाजपातील दोन गटांच्या अंतर्गत कलहाचा परिणाम महापालिकेच्या प्रशासकीय कामजावर होत असून, अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे. महापालिकेत मुख्य लेखापरीक्षक, उपायुक्त, नगररचनाकार, सहायक नगररचनाकार, कर मूल्यांकन निर्धारण अधिकारी, शहर अभियंता यांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांना तारेवरची कसरत करावी लागल्याचे चित्र होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी प्रशासकीय कारभार सांभाळला. यादरम्यान, हार्डशिप अॅन्ड कम्पाउंडिंगच्या नियमावलीवर खुद्द शासनाची भूमिका स्पष्ट नसताना हार्डशिपच्या मुद्यावरून वाघ यांना लक्ष्य करण्याची कोणतीही कसर भाजपाच्या काही नेत्यांनी सोडली नाही. या पृष्ठभूमीवर संजय कापडणीस यांच्या कार्यशैलीकडेअकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
सायंकाळी स्वीकारला पदभार
संजय कापडणीस यांनी जिल्हाधिकाºयांकडून गुरुवारी सायंकाळी मनपाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर ते मनपात दाखल झाले. यावेळी महापौर विजय अग्रवाल यांची भेट घेतली असता महापौरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सायंकाळी साडेसहा वाजता नवनियुक्त आयुक्त कापडणीस यांनी विभाग प्रमुखांसोबत चर्चा करून कामकाजाचा प्राथमिक आढावा घेतला.