महापालिकेत आयुक्तांचे ‘एकला चलाे रे’; अधिकाऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 12:21 PM2021-07-01T12:21:26+5:302021-07-01T12:21:34+5:30
Akola Municipal Corporation : महापालिकेत आयुक्तांची ‘एकला चलाे रे’ ही भूमिका पाहता शासनाचे अधिकारी पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे.
- आशिष गावंडे
अकोला : महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कारभार प्रभावित झाला आहे. शासनाने नियुक्ती आदेश जारी केल्यानंतरही अधिकारी नियुक्तीसाठी तयार हाेत नसल्याची परिस्थिती आहे. मध्यंतरी शासनाने वाशिम येथील नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेल्या दीपक मोरे यांची मनपात सहाय्यक आयुक्त पदाच्या नियुक्तीचे आदेश जारी केले हाेते. परंतु माेरे यांनी वाशिम येथेच थांबणे पसंत केले. वर्तमान परिस्थितीत महापालिकेत आयुक्तांची ‘एकला चलाे रे’ ही भूमिका पाहता शासनाचे अधिकारी पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा अनुशेष निर्माण झाला आहे. महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे महापालिका आयुक्त निमा अरोरा यांच्यावर प्रशासकीय कामकाजाचा ताण वाढल्याचे दिसत आहे. मनपाच्या विविध विभागात असलेली कर्मचाऱ्यांची खाेगीरभरती आयुक्त यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे मध्यंतरी त्यांनी कंत्राटी संगणक चालकांची परीक्षा घेऊन त्यातील ११ जणांची सेवा संपुष्टात आणली होती. त्यानंतर महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या परंतु पुन्हा कंत्राटी तत्त्वावर त्याच हुद्द्यांवर कामकाज करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांची सेवा बंद केली होती. अर्थात, एकीकडे प्रशासनाची घडी सुधारण्याचा प्रयत्न होत असला तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे दैनंदिन कामकाज करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान, काही अधिकारी मनपा आयुक्तांची दिशाभूल करीत असल्याने प्रशासकीय कारभार विस्कळीत हाेत चालला आहे.
शासनाकडे पाठपुराव्याची गरज
महापालिकेत मुख्य लेखा परीक्षक, मुख्य लेखाधिकारी, एक उपायुक्त, सहाय्यक संचालक नगररचना, नगररचनाकार, कर मूल्यांकन अधिकारी, कार्यकारी अभियंता बांधकाम, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग यांसह इतर महत्त्वाच्या रिक्त पदांचा अनुशेष निर्माण झाला आहे. या पदांसाठी मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी शासनाकडे पाठपुरावा करणे अपेक्षित असून, अर्थातच यासाठी महाविकास आघाडीतील लाेकप्रतिनिधींच्या पाठबळाची गरज आहे.
पुनम कळंबे यांचा कार्यकाळ पूर्ण
मनपाच्या सहाय्यक आयुक्त पुनम कळंबे यांच्या सेवेला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. एप्रिल २०२०मध्ये शहरात काेराेनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन काम केले हाेते. वर्तमान परिस्थितीत पुनम कळंबे यांची काेणत्याही क्षणी बदली हाेण्याची शक्यता आहे.