कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचा मोबाइल डाटा मनपा तपासणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 11:01 AM2020-04-12T11:01:43+5:302020-04-12T11:02:10+5:30
मनपा प्रशासनाने पोलिसांच्या सायबर सेलकडे मदत मागितली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोना विषाणूचे ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आलेल्या शहरातील बैदपुरा व अकोट फैल परिसरातील रुग्णांच्या संपर्कात कोणते व्यक्ती होते, याचा तपास करण्यासाठी महापालिकेने संबंधित रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचा मोबाइलचा डाटा तपासण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मनपा प्रशासनाने पोलिसांच्या सायबर सेलकडे मदत मागितली आहे.
संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून, अकोला शहरातही कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आले आहेत.
७ एप्रिल रोजी मनपा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११ येथील बैदपुरा भागातील ६२ वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर आला. त्यानंतर अवघ्या अठरा तासांतच प्रभाग क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या अकोट फैल परिसरात कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळून आला. ही बाब गंभीरतेने घेत महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी बैदपुरा व अकोट फैल परिसराला ‘सील’ करून संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध सुरू केला.
दरम्यान, १० एप्रिल रोजी बैदपुरा येथील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णाच्या कुटुंबातील आणखी तीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर आला.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या निर्देशानुसार आरोग्य पथकाने संबंधित रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित कोरोना बाधित रुग्णांनी माहिती दिली नाही. हा प्रकार पाहता संबंधित रुग्णांचा मोबाइल डाटा तपासण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे.
गत २० दिवसांचा डाटा तपासणार!
बैदपुरा तसेच अकोट फैल येथील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून आलेल्या रुग्णांचा गत २० ते २५ दिवसांचा मोबाइल डाटा तपासण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. याकरिता मनपाने पोलिसांच्या सायबर सेलकडे हा डाटा व त्यांचे मोबाइल लोकेशन तपासून देण्याची विनंती केली आहे.