अकोला महापालिकेची शहर बस सेवा तोट्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:47 PM2018-07-10T13:47:48+5:302018-07-10T13:53:15+5:30
सिटी बसला अकोलेकरांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून बस वाहतूक सेवा तोट्यात सुरू असल्याचे समोर आले आहे.
- आशिष गावंडे
अकोला: सत्ताधारी भाजपासह महापालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करून अकोलेकरांच्या सुविधेसाठी शहर बस वाहतूक सुविधा सुरू केली. बस सेवेचा कंत्राट श्रीकृपा ट्रॅव्हल्सला देण्यात आला. सिटी बसला अकोलेकरांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून बस वाहतूक सेवा तोट्यात सुरू असल्याचे समोर आले आहे. उत्पन्न अन् खर्चाचा ताळमेळ जुळवणे कंपनीला शक्य होत नसल्यामुळे कंपनीकडून बॅटरीवर चालणाºया वाहनांचा शोध घेतला जात असल्याची माहिती आहे.
मनपाची स्थापना झाल्यानंतर २००४ मध्ये तत्कालीन सत्ताधारी भाजप-शिवसेनेने शहरात पहिल्यांदा बस सेवेची मुहूर्तमेढ रोवली होती. या बस सेवेला २०१३ पर्यंत घरघर लागली आणि भंगार झालेल्या बसेसला अपघात होण्याच्या भीतीने तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस-भारिप-बमसंने ही बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुमारे चार वर्ष सिटी बस बंद होती. २०१४-१५ मध्ये मनपात सत्तापरिवर्तन होताच पुन्हा भाजपने सिटी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी श्रीकृपा ट्रॅव्हल्ससोबत ३५ सिटी बसचा करार केला. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाच बसेस सुरू करण्यात आल्या. जानेवारी २०१८ मध्ये आणखी पंधरा बसेस शहरात दाखल झाल्या. सद्यस्थितीत २० पैकी १८ बस शहरात धावत आहेत. यादरम्यान, सिटी बस सेवेला अकोलेकरांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उर्वरित नवीन पंधरा बसची खरेदी करण्यापूर्वी कंपनीने बॅटरीवर चालणाºया वाहनांची शोध मोहीम सुरू केल्याची माहिती आहे.
शालेय विद्यार्थी, कर्मचाºयांना ५० टक्के सुट
शहर बस सेवेला अकोलेकरांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची परिस्थिती आहे. या धर्तीवर श्रीकृपा ट्रॅव्हल्सने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शासकीय-निमशासकीय सेवेतील कर्मचाºयांना तिकिटाच्या दरातून ५० टक्के सुट देण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्पन्न कमी अन् खर्च जास्त
शहरातील प्रमुख रस्त्यांवर १८ बसेस धावत आहेत. सर्व बसेस मिळून कंपनीला दैनंदिन ७३ ते ७६ हजार रुपये उत्पन्न प्राप्त होत आहे. दोन शिफ्टमध्ये काम करणाºया १६० चालक-वाहकांच्या वेतनावर प्रतिदिन ४८ हजार रुपये खर्च होत असून, इंधनासाठी दररोज ४८ ते ५० हजार रुपये मोजावे लागत असल्याची माहिती आहे. कार्यालयीन इतर कर्मचाºयांच्या वेतनाचा खर्च यापेक्षा वेगळा आहे.
मागील अनेक महिन्यांपासून सिटी बस सेवा तोट्यात सुरू आहे. अपेक्षित उत्पन्न प्राप्त होत नसल्यामुळे कर्मचाºयांचा खर्चही भागवणे मुश्कील झाले आहे. पुढील १५ बसेस खरेदी करण्यापूर्वी महापौर, मनपा आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा केली जाईल. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नरत आहे.
-राजेश माने, संचालक, श्रीकृपा ट्रॅव्हल्स.