रस्त्यांचे दस्तऐवज जमा करताना अकोला मनपाची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:31 PM2018-07-17T12:31:00+5:302018-07-17T12:34:26+5:30
अकोला : शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याचे नमूद करीत या प्रकरणी महापालिका प्रशासनाने रस्त्यासंदर्भात प्रकाशित केलेली निविदा प्रक्रिया, कामांचे अंदाजपत्रक, जारी केलेले कार्यादेश व अदा केलेली रक्कम आदी इत्थंभूत माहिती सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी
अकोला : शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याचे नमूद करीत या प्रकरणी महापालिका प्रशासनाने रस्त्यासंदर्भात प्रकाशित केलेली निविदा प्रक्रिया, कामांचे अंदाजपत्रक, जारी केलेले कार्यादेश व अदा केलेली रक्कम आदी इत्थंभूत माहिती सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी देताच मनपाच्या बांधकाम विभागाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. १४ जुलैपासून बांधकाम विभागाच्या संपूर्ण यंत्रणेची दस्तऐवज जमा करताना चांगलीच दमछाक होत असून, निकृष्ट सिमेंट रस्त्याच्या मुद्यावर प्रशासनाने ‘आरआरसी’ कन्स्ट्रक्शनला नोटीस जारी केल्याची माहिती आहे.
अतिवृष्टीने दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कालावधीत मनपा प्रशासनाला १५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून सहा सिमेंटचे व बारा डांबराचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले होते. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी रस्त्यांचे ‘वर्किंग एस्टीमेट’मध्ये बदल करीत १८ फूट रुंद रस्ते ३८ फूट केले. स्थानिक ‘आरआरसी’ कन्स्ट्रक्शन कंपनीला सिमेंट रस्त्याचा कंत्राट मिळाला. २०१५ या कालावधीत सिव्हिल लाइन रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर रस्त्यांची कामे पूर्ण झाली. मध्यंतरी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या पाहणीत मनपा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या रस्त्यांचा दर्जा अतिशय सुमार असल्याचे समोर आले. या प्रकरणी मनपा प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस जारी करून इत्थंभूत माहिती सादर करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यानुषंगाने मनपाने सुद्धा सिमेंट रस्त्यांप्रकरणी ‘आरआरसी’ कन्स्ट्रक्शन कंपनीला नोटीस जारी करण्यासोबतच दस्तऐवज जमा करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू केले आहे.
सिव्हिल लाइन रस्त्याची दुरुस्ती सुरू
मनपाच्या अखत्यारित तयार केलेल्या सिमेंट रस्त्यांच्या गुणवत्तेचा मुद्दा चव्हाट्यावर आल्यानंतर प्रशासनाच्या सूचनेनंतर कंत्राटदाराने रस्ते दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला आहे. सात दिवसांपूर्वी टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट मार्गावरील हॉटेल स्कायलार्क तसेच एलआयएसी आॅफीस समोर पडलेले खड्डे बुजविण्यात आले. १५ जुलै रोजी अग्रसेन चौक ते दुर्गा चौक रस्त्यावर दुरुस्तीचे काम केल्यानंतर १६ जुलै रोजी पुन्हा लेडी हार्डिंग रुग्णालयासमोरील खड्डे बुजविण्यासोबतच सिव्हिल लाइन रस्त्यावर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
बुधवारी मुदत संपुष्टात
सिमेंट रस्त्यांप्रकरणी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांना नोटीस जारी करून, खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. नोटीसला उत्तर सादर करण्यासाठी प्रशासनाने पाच दिवसांचा अवधी मागितला असून, ही मुदत बुधवार, १८ जुलै रोजी संपुष्टात येत आहे.