अकोला महापालिका दिव्यांगांना देणार प्रतिमहा ६०० आणि ८०० रुपये अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 04:15 PM2018-12-16T16:15:09+5:302018-12-16T16:15:21+5:30
अकोला : महानगरपालिकेच्या महासभेने मंजुरी दिल्याप्रमाणे अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नोंदणीकृत दिव्यांगांना वर्गवारीनुसार ६०० आणि ८०० रुपये प्रतिमहा अनुदान दिले जाणार आहे.
अकोला : महानगरपालिकेच्या महासभेने मंजुरी दिल्याप्रमाणे अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नोंदणीकृत दिव्यांगांना वर्गवारीनुसार ६०० आणि ८०० रुपये प्रतिमहा अनुदान दिले जाणार आहे. यासाठी अकोल्यातील दिव्यांगांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन अकोला मनपाचे महापौर विजय अग्रवाल यांनी केले आहे.
दिव्यांग म्हणून नोंदणीकृत असलेल्या १० वर्षांवरील दिव्यांगास ६०० रुपये प्रतिमहा आणि ज्येष्ठ दिव्यांग असलेल्यास ८०० रुपये प्रतिमाह अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा अकोल्यातील दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर योजनेचा लाभ घेताना दिव्यांग व्यक्ती इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभार्थी असला, तरी त्यास अनुदान दिले जाईल. सोबतच दिव्यांग व्यक्तीच्या विवाह झालेल्या पती-पत्नीला (सुदृढ) घर-संसारोपयोगी वस्तू खरेदी करण्याकरिता १० हजारांची मदतही दिली जाणार आहे. थेट लाभार्थीच्या बँक खात्यात ही रक्कम टाकण्यात येणार आहे, तरी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील लाभार्थींनी पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, दिव्यांग प्रमाणपत्र आणि विहित नमुन्यात अर्ज भरून महापालिकेच्या दिव्यांग कक्ष, कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर विजय अग्रवाल यांनी केले आहे.