अकाेला महापालिकेची लवकरच पाेटनिवडणूक ; निवडणूक आयाेगाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 10:40 AM2021-02-03T10:40:42+5:302021-02-03T10:40:59+5:30
Akola Municipal Corporation By-Election प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी आयाेगाने कालावधी निश्चित केला आहे.
अकाेला : काेराेनाच्या कालावधीत शहरातील भाजपच्या दाेन व वंचित बहुजन आघाडीच्या एका नगरसेविकेचे निधन झाले. संबंधित प्रभागांमध्ये रिक्त झालेल्या तीन नगरसेवक पदांसाठी पाेटनिवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयाेगाने महापालिकेला जारी केले आहेत. निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी आयाेगाने कालावधी निश्चित केला आहे.
काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असतानाच अनेक नगरसेवकांनी जनजागृतीसाठी पुढाकार घेतल्याचे चित्र हाेते. काेराेनाशी लढा देत असतानाच अनेकांचा मृत्यू झाला. दरम्यान, या कालावधीत प्रभाग क्रमांक ३ मधील वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका ॲड. धनश्री देव, प्रभाग ४ मधील भाजपचे नगरसेवक संताेष शेगाेकार तसेच प्रभाग ८ मधील भाजपच्या नगरसेविका नंदा पाटील यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे तीन नगरसेवक पद रिक्त झाले असून या ठिकाणी पाेटनिवडणूक हाेणार किंवा नाही, याकडे अनेकांचे लक्ष लागले हाेते. अखेर राज्य निवडणूक आयाेगाने अकाेला महापालिकेसह राज्यातील इतर १६ महापालिकांमधील नगरसेवकांच्या २५ रिक्त पदांसाठी पाेटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
१५ जानेवारीपर्यंतची मतदार यादी ग्राह्य
पाेटनिवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२१ पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार यादीच्या आधारे प्रभागनिहाय मतदारांचे विभाजन केले जाणार आहे.
असा आहे मतदार यादीचा कालबध्द कार्र्यक्रम
- प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करणे- १६ फेब्रुवारी
- मतदार यादीवर हरकती व सूचना- १६ ते २३ फेब्रुवारी
- अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे- ३ मार्च
- मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करणे- ८ मार्च
- प्रभाग निहाय व मतदान केंद्र निहाय अंतिम यादी प्रसिध्द करणे- १२ मार्च
एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणूक
राज्य निवडणूक आयाेगाच्या निर्देशानुसार एप्रिल किंवा मे महिन्यात पाेटनिवडणूक पार पडणार आहे. अर्थात निवडणुकीसाठी तीन महिन्यांचा कालावधी लक्षात घेता इच्छुकांना तयारीसाठी बराच अवधी मिळणार असल्याचे दिसून येत आहे.