कोंडवाडा विभागाकडून मनपाच्या हातावर तुरी; जनावरांना पकडण्याचा दावा ठरला फोल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:50 PM2018-09-01T12:50:45+5:302018-09-01T12:52:50+5:30

akola municipal corporation; fail to catch animals on the roads | कोंडवाडा विभागाकडून मनपाच्या हातावर तुरी; जनावरांना पकडण्याचा दावा ठरला फोल 

कोंडवाडा विभागाकडून मनपाच्या हातावर तुरी; जनावरांना पकडण्याचा दावा ठरला फोल 

Next
ठळक मुद्देशहराच्या कोणत्याही भागात फेरफटका मारा, तुम्हाला मोकाट जनावरांचे पीक फोफावल्याचे दिसून येते. अपयशी ठरत असलेल्या कोंडवाडा विभागाचा मनपाला उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मोकाट जनावरे व श्वान पकडण्यासाठी कोंडवाडा विभागाकडे वाहने उपलब्ध आहेत, तसेच १३ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आहे.


अकोला : शहरातील मुख्य रस्त्यांसह जागोजागी ठिय्या मांडणाºया मोकाट जनावरांची समस्या पाहता अशा जनावरांना पकडण्याचा दावा करणाºया कोंडवाडा विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा विभाग चक्क प्रशासनाच्या हातावर तुरी देत असल्याचे निदर्शनास येताच महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कोंडवाडा विभागात कार्यरत मानसेवी कर्मचारी सुरेश अंभोरे यांची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
शहराच्या कोणत्याही भागात फेरफटका मारा, तुम्हाला मोकाट जनावरांचे पीक फोफावल्याचे दिसून येते. शहराची मुख्य बाजारपेठ असो वा गल्लीबोळात मोकाट जनावरे, कुत्र्यांनी अक्षरश: उच्छाद मांडल्याचे चित्र पाहावयास मिळते. मोकाट जनावरे रस्त्यांवर ठिय्या देत असल्याने वाहनांना अपघात होऊन वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येचा सर्वसामान्य अकोलेकरांना वैताग आला असला, तरी मनपाच्या कोंडवाडा विभागाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. कोंडवाड्यासाठी प्रशासनाकडे सहा ठिकाणी जागा उपलब्ध आहे. यापैकी केवळ जुने शहरातील शिवचरण मंदिरासमोरील कोंडवाड्याचा वापर केला जातो, तर शिवापूर येथील कोंडवाड्याचा नावापुरता वापर केला जात असल्याची माहिती आहे. शहरवासी मोकाट जनावरांच्या समस्येने हैराण असताना कोंडवाडा विभाग प्रमुख सुरेश अंभोरे मात्र दररोज कारवाई करून मोकाट जनावरांना पकडण्याचा दावा करतात. रस्त्यांवर फिरणारे जनावरे पाहता कोंडवाडा विभागाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

कोंडवाडा विभाग बंद करण्याची गरज
मोकाट जनावरांना पकडण्यात अपयशी ठरत असलेल्या कोंडवाडा विभागाचा मनपाला उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पशुपालकांसोबत हातमिळवणी करून चिरीमिरी घेण्यात धन्यता मानणारा हा विभाग बंद करून कंत्राटी पद्धतीने नव्या दमाच्या कर्मचाºयांची भरती करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे मनपाच्या आस्थापनेवरील ताण कमी होण्यासोबतच मोकाट जनावरे, कुत्र्यांची समस्या निकाली काढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.

अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर
कोंडवाडा विभागात एकूण १३ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी बहुतांश कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असून, जे शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत, ते दुपारी कामावरून गायब होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. वेतनाच्या नावाखाली शासन व अकोलेकरांच्या पैशांची उधळण होत असल्याने जनावरे पकडण्यासाठी खासगी कंत्राट देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.


उत्पन्नापेक्षा खर्च अधिक!
मोकाट जनावरे व श्वान पकडण्यासाठी कोंडवाडा विभागाकडे वाहने उपलब्ध आहेत, तसेच १३ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आहे. वाहनांना लागणारे दैनंदिन इंधन, कर्मचाºयांच्या वेतनावर होणारा खर्च पाहता पशुपालकांकडून वसूल केल्या जाणाºया दंडात्मक रकमेपेक्षा प्रशासनाचा खर्च अधिक होत असल्याची परिस्थिती आहे. शहरात सर्वसामान्यांच्या जीविताला धोका निर्माण करणाºया जनावरांसह कुत्र्यांना पकडण्यासाठी या विभागाने दररोज कारवाई करणे क्रमप्राप्त असताना तसे होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी मालमत्ता कर कशासाठी जमा करावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

Web Title: akola municipal corporation; fail to catch animals on the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.