अकोला महापालिकेची अखेर हद्दवाढ!

By Admin | Published: August 31, 2016 03:00 AM2016-08-31T03:00:12+5:302016-08-31T03:00:12+5:30

शासनाने जारी केली अधिसूचना

Akola Municipal Corporation finally extended! | अकोला महापालिकेची अखेर हद्दवाढ!

अकोला महापालिकेची अखेर हद्दवाढ!

googlenewsNext

अकोला, दि. ३0 : पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर मंगळवारी अकोला महापालिकेची हद्दवाढ झाली. मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर नगर विकास विभाग व ग्राम विकास विभागाने तशी अधिसूचना जारी केली.
महापालिकेच्या हद्दवाढीचे घोंगडे मागील पंधरा वर्षांपासून भिजत पडलेले होते. अकोला महानगरपालिका २00१ मध्ये हद्दवाढ न करताच अस्तित्वात आली होती. त्यामुळे प्रारंभी महापालिकेचे नाव अकोला शहर महापालिका असे होते. पुढे नावातून शहर शब्द वगळण्यात आला; मात्र हद्द होती तेवढीच राहिली. पालिकेचे तत्कालीन प्रशासक अनुपकुमार यांनी २00२ मध्येच मनपा हद्दवाढीचा पहिला प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यामध्ये शहरालगतच्या २१ गावांचा समावेश करण्यात आला. विद्यमान महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी ऑक्टोबर २0१६ मध्ये हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव सादर केला. त्यामध्ये २४ गावे प्रस्तावित करण्यात आली. सध्या २८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या अकोला शहराची लोकसंख्या २0११ च्या जनगणेनुसार ४ लक्ष २७ हजार एवढी आहे, तर मनपात नव्याने समाविष्ट केलेल्या २४ गावांचे एकूण क्षेत्रफळ ९६.४ चौरस किलोमीटर असून संबंधित गावांची लोकसंख्या १ लक्ष १२ हजाराच्या आसपास आहे. हद्दवाढीनंतर शहराचे क्षेत्रफळ १२४.४ चौरस किलोमीटर होणार असून महसुली उत्पन्नात मात्र केवळ ४ कोटीची भर पडणार आहे. मे महिन्यात हद्दवाढीच्या हरकती व सूचना निकाली काढल्यानंतर, शासन दरबारी प्रशासकीय कामकाजाला वेग आला होता. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान हद्दवाढ होईल, असे अपेक्षित होते. यादरम्यान, अचानक सोमवारी (२९ ऑगस्ट) रात्री हद्दवाढीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर मंगळवारी नगर विकास विभाग व ग्राम विकास विभागाने हद्दवाढीची अधिसूचना जारी केली.

Web Title: Akola Municipal Corporation finally extended!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.