अकोला मनपाच्या लाचखोर अधिकाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 02:30 PM2019-10-11T14:30:30+5:302019-10-11T14:30:37+5:30
एका हॉटेलचे अतिक्रमण न काढण्यासाठी घनबहादूर याने सुमारे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचा अधिकारी नरेंद्र पुंडलिकराव घनबहादूर याला पाच हजार रुपयांची लाच घेताना अकोलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अतिक्रमण विभागाच्याच कार्यालयातून अटक केली. रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलचे अतिक्रमण न काढण्यासाठी घनबहादूर याने सुमारे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता; मात्र ही कारवाई टाळण्यासाठी अतिक्रमण विभागाचा प्रमुख नरेंद्र पुंडलिकराव घनबहादूर (५४) याने ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली; मात्र तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ९ आॅक्टोबर रोजी पडताळणी केली असता नरेंद्र घनबहादूर याने ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले; मात्र तडजोडीनंतर ही रक्कम १५ हजार देण्याचे ठरले. त्यानुसार १५ हजार रुपयांमधील पाच हजार रुपये पहिला हप्ता गुरुवारी अतिक्रमण विभागाच्या कार्यालयात स्वीकारण्याचे ठरले. तक्रारकर्ता पाच हजार रुपये घेऊन अतिक्रमण विभागाच्या कार्यालयात गेल्यानंतर नरेंद्र घनबहादूर याने पाच हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताच सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घनबहादूर याला रंगेहात अटक केली. त्याच्याकडून पाच हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. लाचखोर घनबहादूर यास शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.