महापालिकेच्या कारभाराचा आज मुंबईत पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 02:50 PM2020-02-11T14:50:06+5:302020-02-11T14:50:11+5:30
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांच्या दालनात ११ फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोला : गत काही दिवसांपासून पारदर्शी व स्वच्छ कारभाराचा दावा करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या कालावधीत भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात आल्यानंतरही संबंधितांची पाठराखण केल्या जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून सातत्याने केला जात आहे. या पृष्ठभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांच्या दालनात ११ फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मनपाच्या कारभाराचा पंचनामा होणार असल्याचे संकेत आहेत.
मनपा प्रशासनाला ४० ते ५० कोटींचा चुना लावणाºया मोबाइल कंपन्या असोत वा निकृष्ट सिमेंट रस्ते, शौचालय बांधकामात लाटलेली कोट्यवधींची देयके तसेच आउटसोर्सिंगद्वारे कागदोपत्री खासगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती यासह विविध विषयांवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांच्या दालनात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांसह वरिष्ठ अधिकाºयांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेता तसेच शिवसेनेच्या गटनेत्यांनाही या बैठकीचे आमंत्रण आहे. या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या ‘अमृत अभियान’ अंतर्गत सुमारे ७० कोटी रुपयांतून भूमिगत गटार योजना आणि ११० कोटी रुपयांतून पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. तांत्रिक सल्लागार असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि देयक अदा करणाºया मनपा प्रशासनाला बोटाच्या तालावर नाचवून दोन्ही योजनांची कामे सर्व निकष-नियम धाब्यावर बसवून पूर्ण केली जात आहेत. हा मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.