अकोला मनपाने गाठला ४१ टक्के कर वसुलीचा आकडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 03:29 PM2019-03-31T15:29:48+5:302019-03-31T15:29:54+5:30
महापालिकेने २९ मार्च रोजी एक दिवसात एक कोटीची वसुली केल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
अकोला: अकोला महापालिकेने मालमत्ता कर वसुलीचा ४१ टक्क्यांचा आकडा अखेर कसाबसा गाठला. ५९ टक्के कर वसुली अजूनही शिल्लक राहिली असून, एका दिवसात पन्नास लाखांच्यावर आकडेवारी जाण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे महापालिका यंत्रणेला आता मालमत्ता कर वसुलीवर भर देणे गरजेचे झाले आहे. महापालिकेने २९ मार्च रोजी एक दिवसात एक कोटीची वसुली केल्याची माहितीही सूत्रांनी दिली. दरम्यान, महापालिका प्रशासनाने शास्ती माफीसाठी रविवार, ३१ मार्च हा शेवटचा दिवस ठेवला असून, अकोलेकरांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
अकोला महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने ६ मार्च २०१९ पर्यंत ३५.६७ टक्क्यांपर्यंतची कर वसुलीची मजल गाठली होती. मार्च महिन्याच्या शेवटच्या चरणातदेखील झपाट्याने आकडेवारी पुढे सरकली नसल्याने मनपा आयुक्तांनी अनेक बैठका घेतल्यात; मात्र थकीत आकडेवारीतील वसुली पन्नास टक्क्यांपर्यंतही पोहोचली नाही. महापालिका कर वसुलीचा आकडा आता ४१ टक्क्यांवर स्थिर झाला असून, त्यापलीकडे जाण्याची शक्यता जवळ-जवळ मावळली आहे. महापालिकेला मागील आणि चालू असे एकूण १०३७७२५३०५ रुपये घेणे होते. यापैकी बरीचशी वसुली महापालिकेच्या कर विभागाने वसूल केली; मात्र अजूनही ५९ टक्के वसुली करायची बाकी आहे. अकोला महापालिकेच्या चार झोननिहाय आकडेवारीनुसार हिशेब लावल्यास अकोला पूर्वची वसुली टक्केवारी सर्वात जास्त आहे. पूर्व झोनने पन्नास टक्क्यांचा आकडा पार केला. इतर झोनच्या प्रमुखांना तशी वसुली करता आलेली नाही.