अकोलेकर बेफिकीर; मनपाने वसूल केला ५२ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 10:44 AM2021-03-03T10:44:57+5:302021-03-03T10:45:03+5:30
Akola News १०५ नागरिकांसह आठ व्यावसायिकांजवळून महापालिकेने मंगळवारी ५२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.
अकाेला : शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असतानादेखील अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. घराबाहेर निघताना ताेंडाला मास्क लावणे अनिवार्य केल्यानंतरही नागरिकांना नियमांचा विसर पडताे कसा? असा सवाल उपस्थित हाेत आहे. नियमांना धाब्यावर बसविणाऱ्या १०५ नागरिकांसह आठ व्यावसायिकांजवळून महापालिकेने मंगळवारी ५२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.
शहरात काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना अकाेलेकर बिनधास्त फिरत असल्याचे दिसत आहे. संशयित रुग्णांनी काेराेनाच्या चाचणीकडे पाठ फिरवल्यामुळे काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १५ फेबुवारीपासून शहरासह जिल्ह्यात जमावबंदी लागू केली. तसेच दि. २३ फेब्रुवारीपासून टाळेबंदी लागू करीत त्यामध्ये ८ मार्चपर्यंत वाढ केली आहे. काेराेनाच्या नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन केले जात असल्याचे पाहून महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी मास्क न लावणाऱ्या व फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविराेधात कारवाईचे निर्देश दिले होते. मंगळवारी मनपा, पाेलीस व महसूल प्रशासनाच्या संयुक्त पाच पथकांनी १०५ बेफिकीर नागरिकांसह आठ व्यावसायिकांजवळून ५२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.
दंड जमा करण्याच्या मानसिकतेत बदल करा !
संसर्गजन्य कोरोनाचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. प्रशासकीय यंत्रणांच्या स्तरावर नागरिकांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले जात आहे. घराबाहेर निघताना तोंडाला मास्क लावणे अनिवार्य केले असताना संयुक्त पथकांकडून दररोज किमान शंभर ते दीडशे बेजबाबदार अकोलेकरांना दंड आकारण्याची कारवाई केली जात आहे. दंडात्मक रक्कम जमा करण्याच्या मानसिकतेत अकोलेकरांनी बदल करण्याची गरज आहे. तरच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.