अकोला महापालिकेचे ‘एलईडी’ खांबावरून लंपास; मनपाकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 03:46 PM2018-04-20T15:46:43+5:302018-04-20T15:46:43+5:30
अकोला: महापालिका प्रशासनाने शहराच्या विविध भागात लख्ख उजेड देणारे एलईडी पथदिवे लावण्यास सुरुवात केली आहे. बाजारभावानुसार एलईडी लाइट महाग असल्याचे ध्यानात घेता चोरट्यांनी त्यांची नजर आता सदर लाइटकडे वळविल्याचे दिसून येते.
अकोला: महापालिका प्रशासनाने शहराच्या विविध भागात लख्ख उजेड देणारे एलईडी पथदिवे लावण्यास सुरुवात केली आहे. बाजारभावानुसार एलईडी लाइट महाग असल्याचे ध्यानात घेता चोरट्यांनी त्यांची नजर आता सदर लाइटकडे वळविल्याचे दिसून येते. उत्तर झोनमधील अकोट रोड, आपातापा रोडवर लावण्यात आलेल्या खांबावरून एक दोन नव्हे, तर चक्क सहा एलईडी लाइटची चोरी झाल्याचा प्रकार प्रभाग क्रमांक-२ च्या नगरसेविका चांदनी शिंदे यांचे पती रवी शिंदे यांच्या निदर्शनास आला. याप्रकरणी मनपाच्या विद्युत विभागाकडे तक्रार केल्यानंतर मनपाच्यावतीने गुरुवारी अकोट फैल पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदविण्यात आली आहे.
मनपा प्रशासनाच्यावतीने शहरातील मुख्य रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवर सीएफएल पथदिवे लावण्यात आले होते. सीएफएलमुळे वीज देयकात बचत होत असल्याचा दावा केला जात असला, तरी त्याच्या अंधुक प्रकाशामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची परिस्थिती होती. अनेकदा पथदिव्यातील चार नळ्यांऐवजी दोन किंवा चक्क एका नळीच्या उजेडावरच संबंधित कंत्राटदार वेळ निभावून नेत होता. हा प्रकार सर्वत्र असल्यामुळे शिवाय सीएफएलच्या अंधुक उजेडामुळे होणारा त्रास लक्षात घेता केंद्रासह राज्य शासनाने आता केवळ एलईडी लाइटचा वापर करण्याचे स्वायत्त संस्थांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच एलईडी पथदिवे लावण्यासाठी थेट केंद्र शासनाने मंजुरी दिलेल्या ‘ईईएसएल’ कंपनीची नियुक्ती केली आहे. यादरम्यान, महापालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख रस्त्यांसह विविध प्रभागांमध्ये एलईडी लाइट कार्यान्वित केले आहेत. लख्ख उजेड देणाऱ्या लाइटची किंमत बाजारभावानुसार जास्त असल्यामुळे आता चोरट्यांनी या लाइटवरच हात साफ केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
मुख्य रस्त्यांवरून लाइटची चोरी
उत्तर झोन अंतर्गत येणाºया अकोट रोड व आपातापा रोडवर लावण्यात आलेल्या सहा एलईडी पथदिव्यांची चोरी झाल्याचा प्रकार काँग्रेसच्या नगरसेविका चांदनी शिंदे यांचे पती रवी शिंदे यांच्या निदर्शनास आला. हा प्रकार मनपाच्या लक्षात आणून दिल्यानंतर विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता अभय जवंजाळ यांनी गुरुवारी अकोट फैल पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. मुख्य रस्त्यावरील खांबावर चढून लाइटची चोरी करण्याचे धाडस करणारे विद्युत क्षेत्राशी संबंधित असल्याचा कयास लावला जात आहे. त्या दिशेने पोलिसांसह मनपा प्रशासनाने तपास सुरू केल्याची माहिती आहे.