अकोला मनपाला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस
By admin | Published: December 31, 2014 12:56 AM2014-12-31T00:56:20+5:302014-12-31T00:56:20+5:30
घनकच-याचे व्यवस्थापन; २५ टक्के निधीची तरतूद नाही.
अकोला : शहरातील घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मनपा प्रशासनाने अर्थसंकल्पात २५ टक्के निधीची तरतूद न केल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वारंवार सूचना देऊनही मनपा निर्णय घेत नसल्याने आयुक्त व महापौरांवर खटला दाखला करण्याचा गर्भित इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला असून, यासंदर्भातील नोटीस प्रशासनाला मंगळवारी प्राप्त झाली.
शहरातील सांडपाण्यापैकी ८0 टक्के सांडपाणी सोडून प्रदूषणाला हातभार लावणार्या महापालिकांच्या ढिसाळ कारभाराला चाप लावण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सातत्याने पत्रव्यवहार केला जातो. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी मनपाने अर्थसंकल्पात २५ टक्के निधीची तरतूद करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाने सप्टेंबर महिन्यात प्रशासनाला दिले होते. त्यानुषंगाने मनपाने अर्थसंकल्पात २५ टक्के निधीची तरतूद करणे क्रमप्राप्त होते. यासंदर्भात प्रशासनाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविणे आवश्यक असताना तसे झाले नाही. यामुळे येत्या पंधरा दिवसांत निधीच्या तरतुदीबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट न केल्यास आयुक्त व महापौर यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीसमध्ये दिला आहे.
घनकचरा व्यवस्थापनासाठी डंम्पिंग ग्राऊंडची नितांत आवश्यकता आहे. शहरानजिकच्या भोड ग्रामपंचायत हद्दीपासून दोन किलो मिटर लांब अंतर असलेल्या जागेची निवड करण्यात आली असली तरी ग्रामपंचायतने जागा देण्यास नकार दिला आहे.पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत हा मुद्दा समोर आला असता,यावर तोडगा काढण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले. भूमिगत गटार योजना मार्गी लागल्यास सांडपाण्याची समस्या आपसुकच निकाली निघेल. प्रदूषण मंडळाच्या नोटीसला उत्तर देण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे मनपा उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने यांनी स्पष्ट केले.