अकोला मनपाचा विद्युत विभाग झोपेत; मुख्य रस्ते, प्रभाग अंधारात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:59 PM2019-03-04T12:59:53+5:302019-03-04T12:59:58+5:30

अकोला : शहराच्या मुख्य मार्गावरील पथदिव्यांची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली मागील महिनाभरापासून पथदिवे नादुरुस्त असल्याचे चित्र आहे. परिणामी, मुख्य रस्त्यांवर ...

Akola Municipal Power Department sleeps; Main roads, the wards have no lights | अकोला मनपाचा विद्युत विभाग झोपेत; मुख्य रस्ते, प्रभाग अंधारात 

अकोला मनपाचा विद्युत विभाग झोपेत; मुख्य रस्ते, प्रभाग अंधारात 

Next


अकोला: शहराच्या मुख्य मार्गावरील पथदिव्यांची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली मागील महिनाभरापासून पथदिवे नादुरुस्त असल्याचे चित्र आहे. परिणामी, मुख्य रस्त्यांवर अंधार पसरला आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, प्रभागातील पथदिव्यांचा बोजवारा उडालेला असताना महापालिकेचा विद्युत विभाग व झोननिहाय कंत्राटदारांनी झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र समोर आले आहे. या समस्येमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, नगरसेवकांचे उदासीन धोरण नागरिकांच्या मुळावर उठल्याचे दिसत आहे.
शहरात लख्ख उजेड देणाऱ्या एलईडी पथदिव्यांच्या उभारणीसाठी शासनाने १० कोटींचा निधी दिला आहे. त्यामध्ये मनपा प्रशासनाने चौदाव्या वित्त आयोगातून १० कोटींची तरतूद करीत २० कोटींच्या कामाचे कार्यादेश जारी केले. शहरात रॉयल इलेक्ट्रिॉनिक कंपनीकडून पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांचा समावेश असून, पथदिवे उभारणीचे काम ७० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाल्याचा दावा मनपाच्या विद्युत विभागाकडून केला जात आहे. एकीकडे एलईडीच्या लख्ख उजेडाचे कौतुक केले जात असले तरी दुसरीकडे मागील सहा महिन्यांच्या कालावधीत पथदिव्यांची यंत्रणा पूर्णत: कोलमडल्याची परिस्थिती आहे. मुख्य रस्त्यांवरील पथदिवे दिवसा सुरू अन् रात्री बंद राहत असल्याचे चित्र आहे. हा प्रकार पाहता महापालिकेचा विद्युत विभाग व झोननिहाय नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदारांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्याची गरज आहे. या गंभीर प्रकाराची मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी दखल घेण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.

दुरुस्तीच्या नावाखाली पथदिवे बंद!
शहरातील मुख्य मार्गावरील पथदिवे सतत नादुरुस्त राहत असल्याचे चित्र आहे. दुभाजकांमधील खांबावर लावण्यात आलेल्या पथदिव्यांच्या दुरुस्तीला दोन-दोन महिन्यांचा कालावधी कसा लागू शकतो, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मध्यंतरी खांबांना कलर लावण्याचे काम सुरू होते. कंत्राटदाराच्या तांत्रिक चुकीमुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराची विद्युत विभाग दखल घेणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

झोननिहाय कंत्राटदारांची मनमानी
पथदिव्यांची यंत्रणा सुरळीत चालावी, यासाठी मनपा प्रशासनाने पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी झोननिहाय कंत्राटदारांची नियुक्ती केली. यामध्ये पूर्व व उत्तर झोनसाठी ए.जे. इलेक्ट्रिक, पश्चिम झोनसाठी शरद पॉवर कंट्रोल व दक्षिण झोनकरिता ब्राइट इलेक्ट्रिक अमरावती यांची नियुक्ती करण्यात आली. ब्राइट इलेक्ट्रिक कंपनी वगळता उर्वरित तीनही कंत्राटदार स्थानिक असल्यामुळे त्यांना शहराच्या गल्लीबोळातील माहिती आहे. असे असले तरी नादुरुस्त पथदिवे दुरुस्त करण्यासाठी कंत्राटदारांना मुहूर्त सापडत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

 

Web Title: Akola Municipal Power Department sleeps; Main roads, the wards have no lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.