अकोला मनपात ‘अनुकंपा’चे उमेदवार वाऱ्यावर; कंत्राटी पदभरतीला ऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:22 PM2018-12-10T12:22:13+5:302018-12-10T12:22:28+5:30
अकोला: तांत्रिक संवर्गातील पदे रिक्त असल्याची सबब पुढे करीत महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने आउट सोर्सिंगमार्फत कंत्राटी कर्मचाºयांची पदभरती करण्याचा सपाटा लावला आहे.
अकोला: तांत्रिक संवर्गातील पदे रिक्त असल्याची सबब पुढे करीत महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने आउट सोर्सिंगमार्फत कंत्राटी कर्मचाºयांची पदभरती करण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये प्रामुख्याने सेवानिवृत्त कर्मचाºयांचा भरणा असून, उद्या सोमवारी आयोजित स्थायी समितीच्या सभेत यासंदर्भात प्रस्ताव सादर केला जाणार आहे. दुसरीकडे मागील २० वर्षांपासून अनुकंपाधारक उमेदवार नियुक्तीसाठी महापालिकेचे उंबरठे झिजवत आहेत. अशा ७४ उमेदवारांचा वाली कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
महापालिकेत कार्यरत कर्मचाºयांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मागील २० वर्षांपासून पात्र ठरलेल्या उमेदवारांना अद्यापही मनपाच्या सेवेत सामावून घेण्यात आले नसल्याने राज्य शासन, महापालिका प्रशासन व सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेत अनुकंपाधारक उमेदवारांची संख्या ७४ पर्यंत असून, मागील अनेक वर्षांपासून त्यांना मनपात नोकरी न मिळाल्याने काही उमेदवारांनी वयाची मर्यादा पार केली आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले आहे. एकीकडे महापालिकेच्या आस्थापना खर्चात वाढ झाल्याची सबब पुढे करीत नवीन कर्मचाºयांची पदभरती करता येणार नाही, असे मत व्यक्त करणाºया प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने आजपर्यंत आउट सोर्सिंगच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाºयांची नेमणूक केली आहे. या बदल्यात संबंधित कंपनीला महिन्याकाठी लाखो रुपयांचे देयक अदा केले जात आहे. कंत्राटी कर्मचाºयांमध्ये बहुतांश कर्मचारी सेवानिवृत्त असल्याने त्यांची कार्यक्षमता कोण तपासणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
अनुकंपाधारकांसाठी आ. गोवर्धन शर्मांचा पुढाकार
एकीकडे कोट्यवधी रुपयांच्या देयकांवर ताव मारणारे अधिकारी-पदाधिकारी दुसरीकडे आस्थापना खर्चात वाढ झाल्याने अनुकंपाच्या उमेदवारांची नियुक्ती करता येत नसल्याची सबब पुढे करतात. २००८ पासून अनुकंपाधारक उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. संबंधित उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे. त्यानुषंगाने मध्यंतरी या विषयावर कार्यवाही करण्याचे पत्र नगरविकास विभागातील कक्ष अधिकारी शशिकांत योगे यांनी जारी केले होते. त्यावर आजपर्यंत प्रशासन व सत्ताधारी भाजपाने कोणताही निर्णय घेतला नाही, हे येथे उल्लेखनीय.
९३ कंत्राटी कर्मचाºयांची होणार नियुक्ती!
मनपाच्या विभागांमध्ये विविध पदांसाठी कंत्राटी तत्त्वानुसार तब्बल ९३ कर्मचाºयांची पदभरती केली जाणार आहे. साहिल इंडस्ट्रीज, भोसरी पुणे यांच्यामार्फत कर्मचाºयांची पदभरती केली जात आहे. देयकाच्या बदल्यात महापालिकेला १५ लाख ५९ हजार ९९९ रुपये महिन्याकाठी अदा करावे लागतील. अर्थात, वर्षभरात हा खर्च दीड कोटींपेक्षा जास्त होणार आहे.
संघर्ष समितीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अनुकंपाच्या उमेदवारांना नोकरीत सामावून न घेतल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा देणारी मनपातील संघर्ष समिती गेली कोठे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊन समितीमधील पदाधिकाºयांची भूमिका संशयाच्या घेºयात सापडली आहे.