कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर डॉक्टरांकडून परस्पर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 11:06 AM2020-10-07T11:06:37+5:302020-10-07T11:06:51+5:30
CoronaVirus in Akola पॉझिटिव्ह निघाल्यानंतर अकोलेकर खासगी डॉक्टरांकडून परस्पर उपचार घेत असल्याची माहिती आहे.
अकोला : शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, जिल्हा सामान्य रुग्णालयातील असुविधांची अकोलेकरांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसत आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर अकोलेकर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल न होता स्थानिक खासगी डॉक्टरांकडून परस्पर उपचार घेत असल्याची माहिती आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेचा वॉच नसल्यामुळे शहरात कोरोनाच्या प्रसाराला हातभार लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.
मनपा क्षेत्रात कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ होत असल्याचे पाहून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या साहाय्याने मनपाच्या भरतीया रुग्णालयात रॅपिड अॅन्टिजन टेस्ट सुरू केल्या होत्या. मागील ४ सप्टेंबरपासून सदर टेस्ट बंद करण्यात आल्या असून, त्या ऐवजी पुन्हा एकदा कोरोनाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांच्या नाकातून नमुने गोळा करण्याला सुरुवात करण्यात आली आहे. यादरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटांची असुविधा आहे. त्या ठिकाणी साफसफाई, तसेच जेवणाचा दर्जा राखला जात नसल्यामुळे अकोलेकरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठ फिरवित स्थानिक खासगी कोविड सेंटरकडे धाव घेतली आहे.
मनपाची वैद्यकीय यंत्रणा कामचुकार
कोरोनाची चाचणी करण्यासाठी अकोलेकर मनपाच्या भरतीया रुग्णालयात किंवा आयएमए सभागृह येथे जात आहेत. चाचणीचा अहवाल मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेकडे दिल्यानंतरही संबंधित वैद्यकीय अधिकारी व परिचारिका रुग्णाशी संपर्क साधण्यात कुचकामी ठरत असल्याचे समोर आले आहे. अहवाल विलंबाने प्राप्त होत असल्याने संबंधित रुग्णाकडून कोरोनाच्या प्रसाराला हातभार लागत आहे.
... म्हणून रुग्णांची आकडेवारी उघड नाही!
जिल्हा सामान्य रुग्णालयातील लॅबमधील चाचणीचे दैनंदिन अहवाल मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेकडे सादर केले जात आहेत; परंतु बाधित रुग्णांची आकडेवारी वर्तमानपत्रांना दिल्यास संबंधित रुग्णांचे कुटुंबीय व परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करावी लागेल या विचारातून वैद्यकीय आरोग्य यंत्रणेकडून कोरोनाबाधित रुग्णांची माहिती, आकडेवारी उघड केली जात नसल्याची माहिती आहे. याकडे आयुक्त संजय कापडणीस लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित होत आहे.