अकोला नाक्यावरील बाजार उठला जिवावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:23 AM2021-08-28T04:23:11+5:302021-08-28T04:23:11+5:30
अकोट कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याने प्रशासनाने या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात बाजार भरविला होता. त्यामुळे अकोला नाका परिसर व खानापूर ...
अकोट कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याने प्रशासनाने या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात बाजार भरविला होता. त्यामुळे अकोला नाका परिसर व खानापूर वेस मार्गावर भाजीपाल्याची दुकाने लागल्याने हा रस्ता अरुंद झाला आहे. दरम्यान, सद्य:स्थितीत कोरोनाची लाट ओसरल्याने अनेक भाजीपाला दुकानदार हे शहरातील आपल्या मूळ जागी गेले आहेत. परंतु, सद्य:स्थितीतही आठवड्यात एकदा भरणारा बाजार दिवसभर भरत असून, या ठिकाणी वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. तसेच परिसरातील दुकानदारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. या परिसरात वसाहती आहेत. त्यामुळे नागरिकांची, विद्यार्थ्यांची रेलचेल आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाल्याची दुकाने रोडवर लागलेली आहेत. या बाजाराच्या मध्यातून जडवाहनांची वाहतूक होत आहे. टिप्पर, ट्रक, गौण खनिज वाहतूक करणारे वाहने दिवसभर कसरत करीत बाजारातून जात आहेत.
फोटो :
अपघात घडण्याची दाट शक्यता
या मार्गावर तालुक्याला स्वस्त धान्य पुरवठा करणारे शासकीय धान्य गोडाऊन आहे. या गोडावूनवर दररोज ७० ते ८० टन घेऊन दहाचाकी ट्रक ये-जा करीत आहेत. त्यामुळे बाजाराच्या ठिकाणी जीव मुठीत घेऊन नागरिकांना बाजारहाट करावा लागत आहे. अशा स्थितीत मोठा अपघात घडून अनेकजण चिरडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय रात्री बाजार उठल्यानंतर मोठ्या प्रमाणात सडक्या भाजीपाल्याचा कचरा या ठिकाणी पडून राहत असल्याने दुचाकी वाहने घसरून अपघात घडत आहेत. शिवाय रेल्वे पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतूक ठप्प होऊन विस्कळीत होत आहे. त्यामुळे येथील बाजार इतरत्र सुरक्षित जागी हलविण्याकरिता महसूल, नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.