अकोला :  ही हलगर्जी कोरोनाचा प्रकोप वाढवणारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:28 AM2020-05-19T10:28:01+5:302020-05-19T10:29:42+5:30

प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव, लोकांची बेफिकीर वृत्ती, यंत्रणेची हलगर्जी यामुळे अकोल्यात कोरोनाचा प्रकोप वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Akola: This negligence is exacerbating the Corona outbreak! | अकोला :  ही हलगर्जी कोरोनाचा प्रकोप वाढवणारी!

अकोला :  ही हलगर्जी कोरोनाचा प्रकोप वाढवणारी!

Next
ठळक मुद्देवाढती रुग्णसंख्या, मृत्यूचा दर यामध्ये अकोला आघाडीवर आहे. दुकानांवरची गर्दी ओसंडून वाहताना दिसते.आता भाजी बाजार बंद केले; मात्र किराणांवरील गर्दी कमी होत नाही.

- राजेश शेगोकार 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आले, संचारबंदी लावण्यात आली. अकोल्यात मात्र २२ मार्चचा जनता कर्फ्यू व त्यानंतरचे दोन दिवस बऱ्यापैकी शिस्त होती; नंतर मात्र डबलसीट, ट्रिपलसीटपासून रस्त्यावरच्या गर्दीचे चित्र कमी-अधिक फरकात कायमच राहिले. त्यात आता मूर्तिजापूरच्या घटनेनंतर प्रशासकीय हलगर्जीची भर पडली आहे. प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव, लोकांची बेफिकीर वृत्ती, यंत्रणेची हलगर्जी यामुळे अकोल्यात कोरोनाचा आणखी प्रकोप वाढवणारी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमरावती, नागपूर, औरंगाबादसारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेत अकोल्याची लोकसंख्या व प्रगती एकदमच कमी आहे; मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत आपण टक्केवारीमध्ये या शहरांनाही मागे टाकले आहे. वाढती रुग्णसंख्या, मृत्यूचा दर यामध्ये अकोला आघाडीवर आहे. सद्यस्थितीत अकोल्यात ४४ प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत; परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत कमीच आहे.
एकीकडे आरोग्य यंत्रणेतील योद्धा कोरोनाशी दोन हात करत जीवाची पर्वा न करता आपली सेवा देत आहेत, तर दुसरीकडे प्रशासकीय स्तरावर अक्षम्य अशी हलगर्जी दिसत आहे.
हातगाडीवर मृतदेह नेण्याचा प्रकार असो की मूर्तिजापूरमध्ये अंत्यसंस्काराची घटना असो, प्रशासन डोळे झाकून काम करते का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. उल्हासनगर येथे मूर्तिजापूरसारखाच प्रकार घडला, कोरोनाचा चाचणी अहवाल येण्यापूर्वीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व विधी पाळण्यात आल्या. केवळ २० लोकांना परवानगी असताना त्यापेक्षा अधिक लोक होते. अंत्यसंस्कार झाले त्या मृतकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांची तपासणी झाली असता तब्बल १० लोकांना बाधा झाल्याचे समोर आले. आता या प्रकरणात याप्रकरणी नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. हे उदाहरण ताजे असतानाच मूर्तिजापुरात चूक घडली त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, तरच भविष्यात दक्षता घेतल्या जाईल, कारण कोरोनाचे संकट मोठे आहे.


...तर नोडल आॅफिसरची मागणी होईल
अकोल्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे. दुसरीकडे यंत्रणांची हलगर्जी समोर येत आहे. पालकमंत्र्यांनी दोन दिवसांचा वर्ग घेतला. नेहमीच्या स्टाइलमध्ये हंगामा करण्यासाठी स्टिंगचा प्रयोगही केला. नंतर ‘जैसे थे’. सर्वोपचारमध्ये रुग्णांची होणारी हेळसांड, साधनांचा अभाव अशा अनेक गोष्टी या सोशल मीडियातून बाहेर येत आहेत. या सर्व बाबींमधून रुग्णांचा सर्वोपचारवर विश्वास डळमळीत होत गेला तर यंत्रणांनी आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल अन् सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी सोलापूरच्या धर्तीवर नोडल आॅफिसरची मागणी होईल. त्यामुळे आतापर्यंत परिश्रम घेतले आहेत. त्यामध्ये फक्त पारदर्शकता अन् सातत्य हवे तरच रुग्णांना सर्वोपचारचा अन् प्रशासकीय यंत्रणेचा आधार वाटेल.


किराणा नेता की कोरोना?
लॉकडाउमध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना सवलत दिली आहे; मात्र ही सवलत जणू बाहेर पडण्याची संधीच आहे असे समजून प्रत्येक दुकानांवरची गर्दी ओसंडून वाहताना दिसते. तेच चित्र भाजी बाजाराचेही होते. आता भाजी बाजार बंद केले; मात्र किराणांवरील गर्दी कमी होत नाही. दुकानांमध्ये जाणाºया बहुतेकांकडे मास्कही नसतात. फिजिकल डिस्टन्सिंग तर दूरच राहिले. अशा स्थितीत आपण किराणा नेतो की कोरोना, याचाही विचार नागरिकांनी केला पाहिजे.

 

Web Title: Akola: This negligence is exacerbating the Corona outbreak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.