वाढदिवस साजर करणाऱ्या प्रेमी युगुलाला जमावाची बेदम मारहाण; अकोल्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 14:47 IST2021-12-13T14:44:55+5:302021-12-13T14:47:58+5:30
ओळख लपवण्यासाठी तरुणीने बुरखा घातला होता, त्यामुळे ती मुस्लीम असल्याचे समजून जमावाने तरुणाला बेदम मारहाण केली.

वाढदिवस साजर करणाऱ्या प्रेमी युगुलाला जमावाची बेदम मारहाण; अकोल्यातील धक्कादायक घटना
अकोला: वाढदिवस साजरा करणे एका जोडप्याला चांगलेच महागात पडले. वाढदिवस साजरा करणाऱ्या एका प्रेमी युगुलाला जमावाने बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार अकोल्यात घडला आहे. घडलेल्या या घटनेचा एका व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय, ज्यात तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण केल्याचे दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घटनेबद्दल संताप व्यक्त करण्यात येतोय.
अकोल्यात प्रेमी युगलाला वाढदिवस साजरा करणे चांगलेच महाग पडले. अकोल्यातील उरल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गायगा पेट्रोल डेपोजवळ एक प्रेमी युगुल वाढदिवस साजरा करत होते. यावेळी काही स्थानिक नागरिकांनी त्यांना अडवले आणि मारहाण सुरू केली. यावेळी तरुणाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण झाली. यावेळी जमावातील एकाने त्याच्या मोबाइलमध्ये हा संपूर्ण प्रकार शूट करुन व्हायरल केला.
नेमके काय घडले ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील गायगा पेट्रोल डेपोजवळ एका प्रेमीयुगुलाला तरुणांच्या टोळक्याने अडवले. ओळख लपवण्यासाठी तरुणीने बुरखा परिधान केला होता. बुरखा घालून ती मुलासोबत जात असल्याचे पाहून काही मुस्लीम तरुणांच्या एका टोळक्याने त्यांना अडवले आणि मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
तरुणीने हात जोडून विनवणी
जमाव तरुणीसमोर तरुणाला बेदम मारहाण करत होते. यावेळी त्या तरुणीने हात जोडून मारहाण न करण्याची विननणी केली. पण, त्या जमावाने मारहाण सुरुच ठेवली. या मारहाणीदरम्यान मुलगी मुस्लीम नसल्याचे लक्षात आल्यानंतर जमावाने मारहाण करणे थांबवले. तसेच, त्या मुलीला सर्वांसमोर बुरखा काढायला भाग पाडले. याप्रकरणी प्रेमी युगुलाकडून लेखी तक्रार दाखल झाली नाही, पण पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे दोघांना अटक केली आहे.