अकोला : पातूर तालुक्यातील चतारी शिवारात बिबट्याने फस्त केली नीलगाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 08:06 PM2017-12-17T20:06:05+5:302017-12-17T20:17:54+5:30
चतारी (अकोला): पातूर तालुक्यातील चतारी शिवारात झालेल्या झटापटीत बिबट्याने नीलगाय फस्त केल्याची घटना शनिवारी रात्री १0.३0 ते ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चतारी (अकोला): पातूर तालुक्यातील चतारी शिवारात झालेल्या झटापटीत बिबट्याने नीलगाय फस्त केल्याची घटना शनिवारी रात्री १0.३0 ते ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चतारी गावापासून थोड्याच अंतरावरील डॉ. श्रीधर ढोरे यांच्या शेतात ही घटना घडली असून, यांच्याच शेताच्या बाजूच्या शेतात रात्री जागलीवर असलेले हरिभाऊ ढोरे यांनी रात्रीच्या वेळी बिबट व नीलगायीमध्ये झालेल्या झटापटीचे आवाज ऐकले. यामध्ये त्यांना बिबट्याच्या डरकाळीचा आवाज येत असल्याने त्यांनी त्याच्या मुलाला फोन करून शेतात बोलावले व त्यांना समजलेला प्रकार सांगितला. दुसर्या दिवशी सकाळी या घटनास्थळाकडे गावातील आठ ते दहा शेतकरी झालेली घटना पाहावयास गेले असता सदर प्रकारात बिबट व नीलगाय यांच्यात झटापट झालेली होती. तेथे जवळपास तीन ते चार गुंठे शेतातील तुरीचे पीक नीलगायीच्या रक्ताने माखलेले आहे व नीलगाय मृतावस्थेत पडलेली होती. या नीलगायीच्या अंगावर बिबट्याच्या पंजाच्या नखाच्या खुणा दिसत आहेत. सदर प्रकार वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नालिंदे यांना कळविले असता, त्यांनी वन विभागाचे एच. आर. राठोड, वनरक्षक एस. ए. तावडे, वनमजूर एस. जी. कळंब, राजीव हुसेन, गजानन मुर्तंडकर, राजकुमार तायडे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. सदर नीलगायीला बिबट्याने ठार केले असल्याची माहिती राठोड यांनी दिली. नीलगायीच्या मृतदेहाचा पंचनामा करून अग्नी देण्यात आला. सदर घडलेल्या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले आहेत.