अकोला : ऑनलाइन फसवणूक झालेल्या दोघांचे पैसे २४ तासांत परत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 02:07 AM2018-04-13T02:07:19+5:302018-04-13T02:07:19+5:30
अकोला : ऑनलाइन खरेदी करताना दोघांच्या खात्यातून परस्पर १ लाख ९ हजार ५00 रुपये काढून फसवणूक केल्यानंतर दोघाही ग्राहकांनी तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनी संबंधित कंपनीच्या अधिकार्यांसोबत संपर्क साधून २४ तासांमध्ये त्यांचे पैसे परत मिळवून दिले. एवढेच नाही, तर गत तीन महिन्यांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांचे नऊ लाख रुपये परत मिळवून दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ऑनलाइन खरेदी करताना दोघांच्या खात्यातून परस्पर १ लाख ९ हजार ५00 रुपये काढून फसवणूक केल्यानंतर दोघाही ग्राहकांनी तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनी संबंधित कंपनीच्या अधिकार्यांसोबत संपर्क साधून २४ तासांमध्ये त्यांचे पैसे परत मिळवून दिले. एवढेच नाही, तर गत तीन महिन्यांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांचे नऊ लाख रुपये परत मिळवून दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रपरिषदेत दिली.
ढोणे कॉलनी शिवर येथे राहणारे सुधाकर मधुकर वानखडे यांनी १0 एप्रिल रोजी तक्रार दिली, की एका फायनान्स कंपनीतून कर्जावर मोबाइल विकत घेतला, त्यानंतर त्यांना क्रेडिट कार्ड देण्यात आले. मोबाइलचे टप्प्या-टप्प्याने पूर्ण पैसे दिल्यानंतरही त्यांना एका फायनान्समधून क्रेडिट कार्ड बंद करण्यात येत आहे. कार्ड सुरू ठेवायचे आहे का, अशी विचारणा झाली. त्यांनी होकार दिल्यावर फायनान्सकडून त्यांना सहा आकड्यांचा संदेश पाठविण्यात आला आणि हे आकडे बरोबर आहेत का, असे विचारले. त्यावर वानखडे यांनी होकार दिला. त्यांच्या खात्यातून ६४ हजार ५५0 रुपये काढण्यात आल्याचा संदेश आला. दुसरे प्रकरण माळीपुर्यात राहणारे सुधीर गणपत बंड यांचे आहे. त्यांनाही एका फायनान्स कंपनीतून फोन आला आणि तुमचे जुने कार्ड बंद होणार आहे. नवीन कार्ड मिळणार आहे, असे सांगून काही संदेश येतील, त्याची माहिती द्यावी, असे सांगण्यात आले. नंतर पुन्हा संदेश आला आणि तुमच्या कार्डमधून ४५ हजार रुपयांच्या दोन वस्तू खरेदी केल्याचे सांगण्यात आल्यावर बंड यांना फसवणूक झाल्याचे कळले. वानखडे व बंड यांनी सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार केली. सायबर पोलीस ठाण्याचे एपीआय प्रवीण धुमाळ, पोलीस शिपाई अतुल अजने यांनी तातडीने दोन्ही तक्रारकर्त्यांच्या पैशांचा वापर करून फ्लिपकार्डवरून खरेदी केल्याचे लक्षात आल्यावर, त्यांनी फ्लिपकार्डच्या नोडल अधिकार्यांसोबत संपर्क साधून करण्यात आलेल्या वस्तूंची डिलिव्हरी थांबविली आणि दोघांनाही त्यांचे पैसे परत मिळवून दिले. असे सांगत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी हे सायबर पोलिसांचे मोठे यश आहे. पत्रपरिषदेचे संचालन पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केले.
पोलिसांकडून आता विविध प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन सुविधा
नागरिकांना आता पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी, पोलीस व्हेरिफिकेशन यासह ध्वनिक्षेपक, आंदोलन, विविध संस्थांना लागणार्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी पोलीस विभागाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
त्यासाठी नागरिकांना आता पोलीस अधीक्षक कार्यालयात, पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. त्यांनी ऑनलाइन अर्ज भरावेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली.
मी बँक अधिकारी बोलत आहे, असे सांगून ग्राहकाला खाते बंद होईल, कार्ड ब्लॉक होईल, अशी भीती दाखविण्यात येते; परंतु कोणतीही बँक एटीएम कार्डचा सोळा अंकी क्रमांक, पिन, पासवर्ड, सीव्हीव्ही क्रमांक, एक्स्पायरी दिनांक विचारत नाही. नागरिकांनी फोनवर अशी माहिती देऊ नये.
- राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक