अकोला-पंढरपूर विशेष रेल्वे मंगळवारी
By admin | Published: July 1, 2017 01:13 AM2017-07-01T01:13:27+5:302017-07-01T01:13:27+5:30
खा. धोत्रे यांचा पाठपुरावा : अकोला-वाशिमच्या भाविकांची सोय
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला व वाशिम जिल्ह्यातील वारकऱ्यांना पंढरपूर जाण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेच्यावतीने मंगळवार, ३ जुलै रोजी अकोला ते पंढरपूर ही विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. खासदार संजय धोत्रे यांच्या पाठपुराव्यामुळे सोडण्यात येणाऱ्या या विशेष रेल्वेगाडीचा फायदा मतदारसंघातील वारकरी व शेतकऱ्यांना होणार आहे.
अमरावती ते पंढरपूर ही रेल्वे गाडी तीन वर्षांपूर्वी आरंभ झाली. त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघातील माना ते शेगाव परिसरातील वारकऱ्यांची सोय झाली; परंतु अकोला - वाशिम या परिसरातील व मतदारसंघातील रिसोड-मालेगाव या भागातील वारकऱ्यांना पूर्णा किंवा परळी जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन खासदार संजय धोत्रे यांनी दक्षिण-मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे सहा महिन्यांपासून या विभागामधून विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा तगादा लावला होता. या अनुषंगाने ३ जुलै १७ रोजी अकोला येथून गाडी क्र.७५२३ अकोला ते पंढरपूर रात्री ८ वाजून १० मी. सुटणार आहे, तर पंढरपूरवरून ५ जुलै १७ रोजी गाडी क्र. ७५२४ सायंकाळी ६ वाजून ४० मी. निघणार आहे. शिवणी, बर्शीटाकळी, वाशिम, पूर्णा परळी, परभणी या मार्गे ही रेल्वे गाडी जाणार असून, या गाडीला ८ जनरल डब्बे, २ स्लिपर कोच लावण्यात येणार आहेत. तसेच नांदेड - पंढरपूर व नगरसोल ते पंढरपूर ही विशेष रेल्वे गाडीसुद्धा सुटणार आहे. यामुळे पश्चिम विदर्भ, मराठवाडा या भागातील यात्रेकरूंना कमी दरात सोय होणार आहे.