‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’चा अकोला पॅटर्न आता कोकण विभागातही
By atul.jaiswal | Published: June 29, 2019 11:57 AM2019-06-29T11:57:06+5:302019-06-29T12:01:07+5:30
अकोला: ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम अमरावती व नाशिक विभागानंतर आता कोकण विभागातील जिल्ह्यांसह मुंबई शहर व उपनगरांमध्येही राबविण्यात येणार आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला: भारत वृक्ष क्रांती मिशनचे संस्थापक ए. एस. नाथन यांच्या संकल्पनेतून समोर आलेला ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम अमरावती व नाशिक विभागानंतर आता कोकण विभागातील जिल्ह्यांसह मुंबई शहर व उपनगरांमध्येही राबविण्यात येणार आहे. अकोला पॅटर्न म्हणून हा उपक्रम दरवर्षी १ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीत सर्व शाळांमध्ये साजरा करण्याचे निर्देश कोकण विभागाचे विभागीय आयुक्त सचिन कुर्वे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे दिले आहेत.
मूळचे तामिळनाडू राज्यातील असलेले ए. एस. नाथन यांच्या ‘एक जन्म-एक वृक्ष’ या संकल्पनेस राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर हा उपक्रम आरोग्य विभागाच्या सहकार्याने सध्या राज्यभरात सुरू आहे. या उपक्रमाच्या यशानंतर नाथन यांनी ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ, नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, हिंगोली, सातरा व लातूर या १३ जिल्ह्यांपर्यंत एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम पोहचला होता. आता कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांसह मुंबई शहर व उपनगरांमध्येही या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून किमान एक झाड लावावे, अशा सूचना असून, यावर लक्ष ठेवण्यासाठी पंचायत समिती स्तरावरील गटशिक्षणाधिकारी यांना ‘नोडल आॅफिसर’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातही पोहचणार
‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम राज्यभरात पोहोचावा यासाठी नाथन प्रयत्नशील असून, ते विविध विभागांचे आयुक्त व विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या भेटी घेत आहेत. आतापर्यंत तीन विभागात हा उपक्रम राबविण्याबाबतचे निर्देश मिळविण्यात त्यांना यश आले आहे. आता पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील जिल्ह्यांमध्येही हा उपक्रम राबविण्याबाबतचे पत्र लवकरच मिळण्याची आशा असल्याचे नाथन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.