‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’चा अकोला पॅटर्न पोहोचला १३ जिल्ह्यांत!
By Atul.jaiswal | Published: June 21, 2019 01:54 PM2019-06-21T13:54:45+5:302019-06-21T13:59:05+5:30
‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम अमरावती व नाशिक विभागातील दहा जिल्ह्यांसह हिंगोली, सातारा व लातूर अशा एकूण १३ जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : गत सात वर्षांपासून वृक्ष संवर्धनासाठी झटणारे भारत वृक्ष क्रांती मिशनचे संस्थापक ए. एस. नाथन यांच्या संकल्पनेतून समोर आलेला ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम अमरावती व नाशिक विभागातील दहा जिल्ह्यांसह हिंगोली, सातारा व लातूर अशा एकूण १३ जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. अकोला पॅटर्न म्हणून हा उपक्रम दरवर्षी १ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीत सर्व शाळांमध्ये साजरा करण्याचे निर्देश उपरोक्त जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच नाशिक विभागाचे उपायुक्त (रोहयो) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले आहेत.
मूळचे तामिळनाडू राज्यातील असलेले ए. एस. नाथन यांच्या ‘एक जन्म-एक वृक्ष’ या संकल्पनेस राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर हा उपक्रम आरोग्य विभागाच्या सहकार्याने सध्या राज्यभरात सुरू आहे. या उपक्रमाच्या यशानंतर नाथन यांनी ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ, नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, हिंगोली, सातरा व लातूर या १३ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपली संकल्पना समजावून सांगितली व ती या जिल्ह्यांमध्ये एक मोहीम म्हणून राबविण्याची विनंती केली. त्यांच्या पाठपुराव्याने आता या जिल्ह्यांमध्ये ‘एक जन्म-एक वृक्ष’ हा उपक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून किमान एक झाड लावावे, अशा सूचना असून, यावर लक्ष ठेवण्यासाठी पंचायत समिती स्तरावरील गटशिक्षणाधिकारी यांना ‘नोडल आॅफिसर’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
काय आहे एक विद्यार्थी-एक वृक्ष’ उपक्रम...
विद्यार्थ्यांना त्यांना सोयीच्या ठिकाणी किंवा जेथे वृक्षाचे संगोपन चांगल्या प्रकारे होईल, अशा ठिकाणी झाड लावण्याची मुभा द्यावी.
विद्यार्थ्याने लावलेल्या झाडास त्याचे नाव द्यावे व त्या विद्यार्थ्याचा वाढदिवस त्या झाडासोबत करण्याबाबत प्रेरणा द्यावी.
विद्यार्थ्यांनी दरमहा झाडाची स्थिती जाणून घ्यावी, एखादे झाड सुकल्यास त्याजागी दुसरे झाड लावावे.
लावलेल्या झाडाचे चांगले संगोपन करणाºया विद्यार्थ्यांची नोंद घेऊन त्याची नोंद कार्यानुभव विषयाच्या गुणांत करावी.
या उपक्रमांतर्गत केलेल्या कामाची यशोगाथा १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात पालक व नागरिकांना सांगावी.
या जिल्ह्यांमध्ये राबविणार उपक्रम!
अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ, नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार व धुळे तसेच हिंगोली, सातरा व लातूर.