अकोला : ‘पोलिस ऑन अॅक्शन मोड’; संचारबंदीत फिरणाऱ्यांना दंडुक्यांचा प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 01:24 PM2020-03-24T13:24:46+5:302020-03-24T16:06:54+5:30
शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही व्यक्तीस मुक्त संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.
अकोला : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याच्या उद्देशाने जमावबंदी टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. अकोला शहरात मंगळवारी संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रशासन कामाला लागले आहे. संचारबंदी असतानाही अनावश्यक बाहेर पडणाऱ्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. वैध कारणाशिवाय दुचाकीवरून फिरणाºयांना प्रसंगी फटकेही खावे लागत असल्याचे चित्र अकोल्यात विविध ठिकाणी पहावयास मिळाले.
कोरोना विषाणूचा जिल्ह्यात फैलाव होऊ नये, याकरिता प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता आणि जनकल्याणाच्या दृष्टीने मंगळवार, २४ मार्च रोजी सकाळी ६ वाजतापासून ३१ मार्च रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी सायंकाळी दिला. या आदेशानुसार संचारबंदीच्या कालावधीत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही व्यक्तीस मुक्त संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.
जिवनावश्यक वस्तुंची खरेदी, दवाखाना, कार्यालयात जाणे या व इतर काही कारणांसाठी बाहेर पडणाºयांना संचारबंदीतून सुट देण्यात आली असली, तरी अनावश्यक बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांवर पोलिस कर्मचारी तैनात आहेत. संचारबंदी असतानाही मंगळवारी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. बाहेर पडणाºया नागरिकांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. कोणत्याही वैध कारणाशिवाय बाहेर पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर अशा नागरिकांना प्रसंगी पोलिसांच्या दंडुक्यांचा प्रसादही खावा लागत आहे.