कोल्हापूर, मीराभाइंदर, नांदेडनंतर होणार अकोला पोलीस आयुक्तालय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 01:25 PM2020-03-05T13:25:50+5:302020-03-05T13:31:42+5:30
अकोल्यातील पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
- सचिन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव २०१२ पासून पोलीस महासंचालक कार्यालय तसेच राज्यसरकारकडे सादर करण्यात आला असला तरी अत्यंत संवेदनशील असलेल्या अकोला पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव मात्र अद्यापही रेंगाळत पडलेला आहे. अकोल्यानंतर मीराभाइंदर, कोल्हापूर, नांदेड आणि नाशिकमधील मालेगाव या चार ठिकाणच्या पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव सादर करण्यात आला; मात्र आता हे चार ठिकाणचे आयुक्तालय झाल्यानंतर अकोल्यातील पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
अमरावती परिक्षेत्रात सर्वाधिक गुन्हेगारी तसेच संवेदनशील शहर तसेच जिल्हा म्हणून अकोल्याची ओळख आहे. राजकीय हत्याकांडासह टोळीयुद्ध, संघटित गुन्हेगारीचे मोठे प्रस्थच अकोल्यात असल्याने या ठिकाणी तातडीने पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी प्रस्ताव तयार केला. त्यानंतर आलेले पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या कार्यकाळात पोलीस आयुक्तालयासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले; मात्र राजकीय वादात अकोल्यातील पोलीस आयुक्तालयाला केवळ हिरवी झेंडी मिळाली; मात्र प्रत्यक्षात ते कार्यान्वित करण्यासाठी आडकाठी आणण्यात आली. भाजपा सरकारच्या कार्यकाळात गृहराज्यमंत्री अकोल्याचे रणजित पाटील यांनी अकोला पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आता गृहखात्याकडून आयुक्तालय निर्मितीसाठी हालचाली सुरू झाल्या असून नांदेड, मीर भाइंदर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील पोलीस आयुक्तालय कार्यािन्वत झाल्यानंतरच अकोला पोलीस आयुक्तालयाचा विचार होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी स्पष्ट केले.
पिंपरी चिंचवडपूर्वी होता प्रस्ताव
अकोला पोलिीस आयुक्तालयाचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पूर्वीचा आहे. त्यासाठी असणारे निकषही पूर्ण करण्यात आले आहेत; मात्र आधीचा प्रस्ताव असतानाही पिंपरी चिंचवड येथे आयुक्तालय कार्यान्वित झाले तर अकोल्यातील पोलीस आयुक्तालयासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.