अकोला पोलिसांचा अफलातून प्रकार; तक्रारदारालाच मागितले सीसी फुटेज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 11:36 AM2020-10-28T11:36:18+5:302020-10-28T11:38:41+5:30
Akola Police सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात २४ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.
अकोला : एका चोरी प्रकरणातील तक्रारकर्त्याला पोलिसांनी सीसी फुटेज मगितल्याचा अफलातून प्रकार घडला. त्यामुळे तक्रारकर्ता कमालीचा चक्रावून गेला आहे. सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात २४ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.
अकोला शहरातील कृषी नगरातील रहिवासी असलेला आशीष अंबादास भांदुर्गे हा तरुण सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या खुले नाट्यगृहाजवळ नाश्त्याची गाडी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. २४ ऑक्टोबरच्या रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून आशीष भांदुर्गे घरी गेल्यावर रात्री उशिरा त्याची गाडी खुले नाट्यगृहापासून थोड्या अंतरावर नेऊन गाडीतील ३ डझन प्लेट, बॅटरी, पाण्याची कोठी, स्टूल असा एकूण ९ हजारांचा मुद्देमाल अज्ञात इसमाने चोरी करून नेल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेला; मात्र त्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिसांनी दाखल तर करून घेतली; परंतु तक्रारकर्त्यालाच नमूद चोरीचे सीसी फुटेज आणायला सांगिल्याने तक्रारदार कमालीचा चक्रावून गेला आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे न्याय कोणाकडे मागावा, असा यक्षप्रश्न तक्रारदार यांच्यापुढे निर्माण झाला आहे.