अकोला : प्रशांत निंघोट खून प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:43 PM2017-12-25T23:43:28+5:302017-12-25T23:44:29+5:30
अकोला : भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत निंघोट यांची हत्या करणार्या चार आरोपींना खदान पोलिसांनी अटक केली असून, यामधील दोन आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, तर गुरुवारी अटक केलेल्या अश्विन सिरसाट, अंकुश सपकाळ या दोघांची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी वाढ केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

माधव नगरातील गजानन विहार अपार्टमेंटमधील रहिवासी प्रशांत सुखलाल निंघोट हे माजी आमदार राम पंडागळे यांच्या भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते. गुरुवार, १४ डिसेंबर रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास प्रशांत निंघोट घरी असताना भीम नगरातील रहिवासी आकाश ऊर्फ पव्या सिरसाट, आशिष ऊर्फ आशुल्या सिरसाट, प्रेमा सिरसाट, अंकुश सपकाळ यांच्यासह चार अनोळखी युवक त्यांच्या घरासमोर येऊन प्रशांत निंघोट यांना घराबाहेर घेऊन गेले. यावेळी प्रशांत निंघोट यांनी त्यांचा मित्र अमर इंगळे याला सोबत घेतले. रिंग रोडवरील पिल कॉलनीजवळ प्रशांत निंघोट व अमर इंगळे या दोघांसोबत आकाश सिरसाट, आशुल्या सिरसाट, प्रेमा, अंकुश व इतर चार युवकांनी वाद घातला. या वादातून सदर आरोपींनी निंघोट व इंगळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये प्रशांत निंघोट यांचा जागेवरच मृत्यू झाला तर अमर इंगळे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी फरार झाले; मात्र पोलिसांनी आकाश सिरसाट, आशुल्या सिरसाट या दोघांना अटक केली असून, त्यांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यानंतर गुरुवारी अश्विन सिरसाट व अंकुश सपकाळ या दोन आरोपींना अटक केली असून, त्यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी वाढ केली आहे. अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. फरार असलेल्या चार अज्ञात आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.