अकोला पोलीस अधीक्षकांचा ठाणेदारांना मानसिक त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 06:58 AM2020-04-13T06:58:21+5:302020-04-13T06:58:31+5:30
खाकीतील अनागोंदी चव्हाट्यावर : विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार
चेतन घोगरे
अंजनगाव सुर्जी (अमरावती) : अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गावकर यांच्यावर मानसिक त्रासाला कंटाळून सिक रजेवर जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत त्यांनी अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार नोंदविली आहे.
तक्रारीनुसार, तक्रारदार सुरेश हरिभाऊ नाईकनवरे हे अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपली सेवा सहा वर्षे शिल्लक आहे. पोलीस दलात २१ वर्षांची सेवा दिली. मात्र, अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गावकर हे मला जिल्ह्यात हजर झाल्यापासून लहान-लहान कारणांवरून अश्लील शिवीगाळ करून अपमानित करत आहे. एसपींनी मला १० एप्रिल रोजी दुपारी कक्षात बोलावून ‘इडियट यू बास्टर्ड’ म्हणून शिवीगाळ केली व तुम्ही आयुक्तांना माझ्या परवानगीशिवाय पत्र का दिले, असे म्हणून माझा अपमान केला. त्यामुळे माझा रक्तदाब वाढला असून माझी शारीरिक हानी होण्याची शक्यता आहे. याच कारणावरून माझा आत्महत्येचा विचार चालू आहे. त्यामुळे मी हतबल झालो आहे. मी सध्या अकोला येथे राहत असून, माझी पत्नी व परिवार बीड जिल्ह्यात राहत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या संचारबंदीमुळे सध्या आपणास भेटणे शक्य नसल्याने मी लेखी पत्र तसेच पोलीस अधीक्षक अमोल गावकर यांनी केलेल्या शिवीगाळीच्या तीन आॅडिओ क्लिप आपल्या व्हाट्सअॅपवर पाठविले आहेत, असे त्यांनी स्पेशल आयजींना केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत त्यांनी अकोला सिटी कोतवाली येथे नोंद घेतली आहे. याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
नाईकनवरेंची बुलडाण्यात बदली
जिल्हा पोलीस अधीक्षकांविरूद्ध तक्रार करणाºया आणि अकोला सिटी कोतवाली येथे ठाणेदार असलेल्या सुरेश नाईकनवरे यांची बुलडाणा येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अमोल गावकर यांनी १२ एप्रिल रोजी त्याबाबतचे आदेश काढले आहेत.