अकोला पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह; अर्पित जयस्वाल सापडेना, डॉ. मंत्रीही फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 11:24 AM2020-10-28T11:24:03+5:302020-10-28T11:27:28+5:30
बेकायदेशीर चाचण्या करणारा डॉ. राम मंत्री फरार असून, त्याचा अद्यापही पोलिसांना शोध लागला नाही.
अकोला : जुने शहरातील रहिवासी असलेल्या एका नोकराचे अपहरण करून त्याची शेती बळकावण्याचा प्रयत्न करणारा मद्यसम्राटाचा मुलगा अर्पित जयस्वाल व रवी सातव १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यावरही पोलिसांना मिळत नसून, कोरोनाच्या चाचण्या करण्याची परवानगी नसतानाही बेकायदेशीर चाचण्या करणारा डॉ. राम मंत्री फरार असून, त्याचा अद्यापही पोलिसांना शोध लागला नाही. यावरून अकोला पोलिसांचा कारभार पुरता बिघडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
अकोल्यातील लब्धप्रतिष्ठित म्हणून ओळख असलेल्या राजू जयस्वाल यांचा मुलगा अर्पित जयस्वाल व मॅनेजर रवी सातव या दोघांनी संजय हातोले नामक कामगाराचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवले होते. जुने शहर पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली; मात्र नंतर ३२४ आणि दबाव वाढताच अपहरण आणि अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला; मात्र त्यानंतर आरोपी मोकाट असून, अद्यापही त्यांना अटक केलेली नसल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अर्पित आणि रवि हे दोघेही फरार असताना पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी काहीही प्रयत्न केले नसल्याचे वृत्त आहे. तर कोरोना चाचण्यांची परवानगी नसतानाही चाचण्या करून त्याचे अहवाल तयार करणारऱ्या डॉ. राम मंत्री व ठाण्यातील लॅबचे संचालक प्रवीण शिंदे यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र आरोपींना अद्यापही अटक केली नसल्याने पोलिसांचे या दोन्ही श्रीमंत असलेल्या आरोपींना अभय असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
उपक्रमांची केवळ घोषणाच
पोली अधीक्षक जी. श्रीधर रुजू झाल्यानंतर विविध उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत; मात्र या योजनांची केवळ घोषणाच असून, प्रत्यक्षात केवळ काम शून्य असल्याचे वास्तव आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपी फरार असताना पोलिसांना मात्र त्यांचा मागमुसही लागत नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यावरून पोलिसांवर गुन्हेगार भारीच पडत असल्याचे दिसून येत आहे. किरकोळ चोऱ्या व दुचाकी चोरट्यांना अटक करून प्रसिद्धी मिळविणाऱ्या पोलिसांना मात्र बड्या हस्तींचा मुलगा असलेला अर्पित जयस्वाल, कोरोनाच्या बनावट चाचण्या करणारा डॉ. राम मंत्री मिळत नसल्याचेही वास्तव आहे.