कार खरेदी फसवणुकीत अकोला पोलिसांकडूून पुण्यात चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 11:13 AM2020-09-20T11:13:20+5:302020-09-20T11:13:50+5:30
पोलिसांच्या चौकशीत ही कार मिरगे यांनी पुण्यात विकल्याचे समोर येताच जुने शहर पोलिसांनी पुण्यात पथक पाठवून कार खरेदीदारांची चौकशी केली.
अकोला : पारसकर हुंडाई शोरूम येथून कार खरेदी केल्यानंतर ओळखीचा फायदा घेत पोस्ट डेटेड चेक (पीडीसी) देण्याचे आमिष देऊन ते चेक न देता शोरूम मालकाची सुमारे ४ लाख ९३ हजार ८९९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या डॉ. आशा मिरगे व त्यांचा पुत्र अनिमेष मिरगे या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत ही कार मिरगे यांनी पुण्यात विकल्याचे समोर येताच जुने शहर पोलिसांनी पुण्यात पथक पाठवून कार खरेदीदारांची चौकशी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तसेच महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉ. आशा मिरगे व त्यांचा पुत्र अनिमेष मिरगे या दोघांनी ६ लाख ६८ हजार रुपयांची आसेंट कार ३० सप्टेंबर २०१९ रोजी पारसकर हुंडाई येथून खरेदी केली, तसेच २६ हजार रुपयांच्या अॅसेसरिज लावल्या. कारची रक्कम ९ धनादेशांद्वारे देण्याचे विवेक पारसकर यांना सांगितले. यावर पारसकर यांनी विश्वास ठेवला तसेच मुलगा पुण्याला राहत असल्याने कार पुण्याला नेणार असल्याचे सांगत कारची पासिंगही तातडीने करून घेतली; मात्र पारसकर यांनी पैसे मागितले असता, आशा मिरगे यांनी १ लाख रुपयांचा धनादेश २ मार्च रोजी दिला. त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे विवेक पारसकर यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आशा मिरगे व त्यांचा पुत्र अनिमेष मिरगे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून जुने शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दरम्यान तपास अधिकारी कारच्या शोधासाठी तसेच चौकशीसाठी पुणे येथे गेले असता सदर कार मिरगे यांनी एका कंपनीला विकल्याचे समोर आले. त्यानंतर कंपनीने ही कार आणखी तिसऱ्या व्यक्तीस विकली; मात्र मिरगे यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल होताच कार खरेदी केलेल्या व्यक्तीने पैसे परत घेऊन ती कार कंपनीला परत केल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत असून, पुण्यात चौकशीसाठी गेलेले पथक परतले आहे.