अकोला पोलिसांवर ट्रक घालण्याचा गुरे तस्करांचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:17 AM2017-12-01T01:17:38+5:302017-12-01T01:18:31+5:30
अमरावतीवरून अकोल्याकडे गुरांना एका ट्रकमध्ये कत्तलीसाठी डांबून आणण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने शिवणी ते टॉवर चौकपर्यंत पाळत ठेवून या ट्रकला बुधवारी मध्यरात्री पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र ट्रकचालकाने पोलिसांवर ट्रक आणण्याचा प्रयत्न करून तो फरार झाला. अकोला पोलिसांनी या ट्रकचा चोहोट्टा बाजारपर्यंत पाठलाग केला; मात्र ट्रकचालक पळून जाण्यात यशस्वी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अमरावतीवरून अकोल्याकडे गुरांना एका ट्रकमध्ये कत्तलीसाठी डांबून आणण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने शिवणी ते टॉवर चौकपर्यंत पाळत ठेवून या ट्रकला बुधवारी मध्यरात्री पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र ट्रकचालकाने पोलिसांवर ट्रक आणण्याचा प्रयत्न करून तो फरार झाला. अकोला पोलिसांनी या ट्रकचा चोहोट्टा बाजारपर्यंत पाठलाग केला; मात्र ट्रकचालक पळून जाण्यात यशस्वी झाला.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना अमरावती येथून एक गुरांना डांबून कत्तलीसाठी अकोल्यात ट्रक येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने ट्रकवर शिवणी येथून पाळत ठेवली, तसेच अशोक वाटिका चौक, नेहरू पार्क चौक व टॉवर चौकात पथकाचे कर्मचारी ट्रकवर पाळत ठेवून होते, ट्रक शिवणी येथून अशोक वाटिकेकडे आला, त्यानंतर थेट तेलीपुरा चौकाकडे ट्रक जात असताना विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे व पथकाने ट्रकला अडविण्याचा प्रयत्न केला; मात्र ट्रकचालकाने सदर ट्रक पोलीस दिसताच सुसाट पळविण्याचा प्रयत्न केला, यावेळी अळसपुरे यांनी ट्रकच्या काचेवर काठी मारल्याने ट्रकच्या काचा फुटल्या, त्यानंतर ट्रकचालकाने ट्रक अकोट फैल परिसरातून चोहोट्टा बाजाराकडे पळविला. विशेष पथकाचे कर्मचारी दुचाकीवर होते, त्यांनी ट्रकचा चोहोट्टा परिसरापर्यंत पाठलाग केला; मात्र ट्रक भरधाव निघून गेला. या प्रकरणाची नोंद नियंत्रण कक्षात करण्यात आली असून, याद्वारे पुढील पोलीस ठाण्यांना माहिती देण्यात आली; मात्र दहीहांडा व अकोट पोलिसांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याची माहिती आहे.
नियंत्रण कक्षाला माहिती
गुरांना कत्तलीसाठी घेऊन जाणार्या ट्रकचालकाने विशेष पथकाच्या पोलिसांवर ट्रक नेण्याचा प्रयत्न करून तो पळून गेल्याची माहिती तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. या माहितीच्या आधारे नियंत्रण कक्षात नोंद घेऊन ट्रकचा शोध सुरू करण्यात आला; मात्र तोपर्यंत ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला होता.