वादळाने वीज यंत्रणेची वाताहत, अथक प्रयत्नांनंतर वीजपुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 11:23 AM2021-05-20T11:23:52+5:302021-05-20T11:26:19+5:30

Akola MSEDCL News : अथक प्रयत्न करीत तब्बल १ लाख २० हजार नागरिकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळविले.

Akola : The power supply was restored after a tireless effort | वादळाने वीज यंत्रणेची वाताहत, अथक प्रयत्नांनंतर वीजपुरवठा पूर्ववत

वादळाने वीज यंत्रणेची वाताहत, अथक प्रयत्नांनंतर वीजपुरवठा पूर्ववत

googlenewsNext
ठळक मुद्देरात्रभर राबली महावितरणची यंत्रणाअधिकारी, कर्मचारी ऑनफिल्ड

अकोला : तौक्ते वादळाचा परिणाम म्हणून मंगळवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या वळीवाच्या पावसाने जिल्ह्यातील वीज यंत्रणेची पुरती वाताहत झाली. महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्रभर व बुधवारी दिवसा अथक प्रयत्न करीत तब्बल १ लाख २० हजार नागरिकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळविले.

जिल्ह्यात सायंकाळी ७ च्या सुमारास आलेल्या वादळाचा फटका महावितरणला बसला. या वादळामुळे झाडे उन्मळून पडल्याने वीज यंत्रणा विस्कळीत होऊन अकोला शहरासह अनेक गावांचा वीजपुरवठा प्रभावित झाला होता. वादळ एवढे प्रचंड होते की शहरात जवळपास १५० ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या किंवा झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे वीजवाहिन्या व रोहित्रे बाधित झाल्याने ३३ केव्ही कौलखेड, ३३ केव्ही वाशिम बायपास, ३३ केव्ही खडकी आणि ३३ केव्ही डाबकी ही चार उपकेंद्रे बंद पडली होती. याशिवाय ११ केव्हीच्या ३८ वीज वाहिन्यांचे नुकसान झाल्याने कृषी विद्यापीठ परिसरातील जम्बो कोविड केंद्र, जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर्वोपचार रुग्णालयासह १७ कोविड रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळ ओसरताच युद्धस्तरावर महावितरणची संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्याने पहिल्या दोन तासांतच शहरातील सर्व कोविड रुग्णालये, काेविड केअर सेंटरसह ६० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले. अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर व रोहित्रावर झाडे पडल्याने तेथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे काम सुरूच होते. अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, कार्यकारी अभियंता सुनील कळमकर हे प्रत्यक्ष फिल्डवर असल्याने १५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने जवळपास ९५ टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.

 

जुने शहरात मोठे नुकसान

विशेष म्हणजे जय हिंद चौकात १५० वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाडच महावितरणच्या रोहित्रावर पडल्याने रोहित्र वाकले. शिवाय यामध्ये दोन वीज खांब तुटले होते आणि त्यामुळे या वाहिनीवर असलेल्या दोन कोविड सेंटरचाही वीजपुरवठा बाधित झाला होता. परंतु, या कोविड सेंटरचा बाधित झालेला वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून रात्रीच सुरळीत करण्यात आला आणि बुधवारी महानगरपालिका व नगर सेवक राजेश मिश्रा यांच्या मदतीने पडलेले झाड हटवून रोहित्र सरळ करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय ते सरकारी बगीचा रस्त्यावर ११ केव्ही वीज वाहिनीवर झाड पडल्याने वीज खांब वाकून बाधित झालेला वीजपुरवठा पडलेले झाड तोडल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता सुरळीत करण्यात आला.

कोविड रुग्णालयांचा वीजपुरवठा दोन तासांतच बहाल

कृषी विद्यापीठ जम्बो कोविड केंद्र, जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयासह १७ कोविड रुग्णालयांचा खंडित झालेला वीज पुरवठा प्राधान्याने पहिल्या दोन तासांतच महावितरणकडून सुरळीत करण्यात आला. रोहित्रावरच झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने युध्दस्तरावर प्रयत्न करून दोन तासांतच शासकीय महाविद्यालयाचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरळीत केला.

 

अकोट विभागातील सात उपकेंद्रे अंधारात

वादळाचा फटका महावितरणच्या अकोट विभागालाही जबरदस्त बसला आहे. वादळामुळे महावितरणची ७ उपकेंद्रे ही अंधारात गेली होती. परंतु ५ उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला मंगळवारी रात्रीच यश आले. परंतु दोन उपकेंद्रे ही एकाच वाहिनीवर होती. शिवाय त्या वाहिनीवर झाडे पडल्याने दोन खांब तुटले होते. त्यामुळे त्या दोन उपकेंद्राचा वीजपुरवठा आज सुरळीत करण्यात आला आहे.

 

वादळामुळे अकोला शहरातील वीज यंत्रणा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. महावितरणने रात्रभर अथक परिश्रम करून वीजपुरवठा बहाल करण्यात यश मिळविले. या काळात नागरिकांना त्रास झाला, परंतु त्यांनी दाखविलेल्या सहनशिलतेसाठी महावितरण त्यांचे आभारी आहे.

-- पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता, अकोला मंडळ

Web Title: Akola : The power supply was restored after a tireless effort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.