अकोला : नेकलेस रोडच्या रूंदीकरणासाठी मालमत्ताधारक सरसावले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 02:57 PM2018-05-08T14:57:15+5:302018-05-08T14:57:15+5:30
अकोला : नेकलेस रस्त्याच्या रूंदीकरणाआड येणारे अतिक्रमण हटविण्यासाठी स्थानिक मालमत्ताधारक सरसावले असून, रस्त्यालगतची दुकाने, प्रतिष्ठाणे यांचा अतिक्रमीत भाग हटविण्याच्या कामाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला.
अकोला : नेकलेस रस्त्याच्या रूंदीकरणाआड येणारे अतिक्रमण हटविण्यासाठी स्थानिक मालमत्ताधारक सरसावले असून, रस्त्यालगतची दुकाने, प्रतिष्ठाणे यांचा अतिक्रमीत भाग हटविण्याच्या कामाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. नझुल शिटनुसार आरक्षित असलेल्या रस्त्याची संपूर्ण जागा मोकळी केली जाणार असून, मनपा प्रशासनाने मालमत्ताधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी २० मे पर्यंतची मुदत दिली आहे.
महापालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी शासनाकडून निधीचा ओघ सुरूच आहे. प्राप्त निधीतून अकोला शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण तसेच एलईडी पथदिव्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येते. सिव्हिल लाइन ते मुख्य पोस्ट आॅफिस, दुर्गा चौक ते अग्रसेन चौक, धिंग्रा चौक ते सिटी कोतवाली ते थेट किल्ला चौक, अशोक वाटिका ते सरकारी बगिचा, श्रीवास्तव चौक ते डाबकी रोड, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉटपर्यंत मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. नेहरू पार्क ते थेट संत तुकाराम चौकापर्यंत होणाऱ्या गोरक्षण रोडचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याच धर्तीवर आता नेहरू पार्क चौक ते सिव्हिल लाइन चौक, रतनलाल प्लॉट चौक ते दुर्गा चौकापर्यंत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, या रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणाऱ्या मालमत्तांचे अतिक्रमण हटविण्यासाठी मनपा प्रशासन सक्रिय झाले आहे. मध्यंतरी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी नेकलेस रस्त्याची पाहणी केल्यानंतर रस्त्यालगतच्या मालमत्ताधारकांसोबत महापालिकेत बैठक आयोजित केली होती. रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यासाठी मालमत्ताधारकांना २० मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. रस्त्याचे रूंदीकरण होणारच, हे गृहीत धरून नेकलेस रस्त्यालगतच्या मालमत्ताधारकांनी स्वत: पुढाकार घेत दुकाने, प्रतिष्ठाणांचा अतिक्रमीत भाग स्वत: काढून घेण्यास प्रारंभ केल्याचे चित्र दिसून येत आहे.
मनपाच्या ‘मार्किंग’मुळे मार्ग सोपा
महापालिकेच्या नगररचना विभागाने सिव्हिल लाइन चौक ते रतनलाल प्लॉट चौक ते दुर्गा चौकपर्यंत रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या मालमत्तांना ‘मार्किंग’ केली आहे. मालमत्तांवर लाल रंगाचे निशाण केल्यामुळे मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्ता हटविण्याचा मार्ग सोपा झाला आहे.