Akola: अकोला मार्गे पुणे-अमरावती-पुणे एसी चेयर कार विशेष एक्स्प्रेस शुक्रवारपासून
By Atul.jaiswal | Published: November 9, 2023 07:03 PM2023-11-09T19:03:02+5:302023-11-09T19:03:22+5:30
Special Express Train: आगामी सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते अमरावती या दोन स्थानकांदरम्यान शुक्रवार १० नोव्हेंबरपासून विशेष एसी चेअर कार विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला - आगामी सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते अमरावती या दोन स्थानकांदरम्यान शुक्रवार १० नोव्हेंबरपासून विशेष एसी चेअर कार विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला मार्गे धावणार असलेल्या या विशेष एक्स्प्रेसच्या ११ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अप व डाऊन अशा एकूण १८६ फेऱ्या होणार असून, या गाडीला अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, गाडी क्र. ०११०१ पुणे-अमरावती एक्स्प्रेस शुक्रवार १० नोव्हेंबर ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पुणे स्थानकावरून दररोज सकाळी ११:०५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता अमरावती येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०११०२ अमरावती-पुणे एक्स्प्रेस शनिवार, ११ नोव्हेंबर ते ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत अमरावती स्थानकावरून दररोज रात्री १०:५५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार आहे. अप व डाऊन मार्गावरच्या या गाड्यांना उरूळी, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापुर, कोपरगांव, मनमाड, चाळीसगांव, काजगांव, पाचोरा, जळगांव , भुसावळ, मलकापुर, शेगांव, अकोला, बडनेरा स्थानकांवर थांबा असणार आहे. एलएचबी कोचसह धावणाऱ्या या विशेष रेल्वेला १७ डबे असून, द्वितीय श्रेणी चेयर कार १३, एसी चेयर कार श्रेणी ०१, स्लीपर श्रेणी ०१, द्वितीय श्रेणी व एसएलआर ०२ अशी संरचणा असणार आहे.