Akola: यंदा रब्बीचे क्षेत्र ३० हजार हेक्टरने वाढणार, मान्सून विलंबाने दाखल झाल्याचा परिणाम
By रवी दामोदर | Published: September 18, 2023 12:49 PM2023-09-18T12:49:34+5:302023-09-18T12:51:09+5:30
Akola: अकोला जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र सरासरी पेरणी क्षेत्रापेक्षा ३० हजार हेक्टरने अधिक वाढणार आहे. त्यानुसार, कृषी विभागाने नियोजन केले असून, आवश्यक बियाण्यांच्या व खतांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने नियोजन केले आहे.
- रवी दामोदर
अकोला - जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र सरासरी पेरणी क्षेत्रापेक्षा ३० हजार हेक्टरने अधिक वाढणार आहे. त्यानुसार, कृषी विभागाने नियोजन केले असून, आवश्यक बियाण्यांच्या व खतांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने नियोजन केले आहे. मान्सून विलंबाने दाखल झाल्याने मूग, उडीद पिके बाद झाली. परिणामी रब्बी क्षेत्र वाढले असून, त्यामध्ये सार्वाधिक क्षेत्र हरभऱ्याचे असणार आहे. यंदा रब्बी हंगामात १ लाख ५८ हजार ९११ हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. त्यामध्ये हरभरा पिकाचे क्षेत्र २० ते २५ टक्क्यांनी वाढले असून, तब्बल १ लाख २६ हजार ४६८ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे.
गत तीन-चार वर्षांपासून खरीप हंगामात होत असलेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. नुकसान झालेले क्षेत्र रब्बीमध्ये वाढत आहे. यंदा मान्सून विलंबाने दाखल झाल्याने उडीद, मूग पिके बाद झाली, तर सोयाबीनला फटका बसला. त्यामुळे यंदाही रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात पावसाची तूट आहे, परंतु प्रकल्पांमध्ये मुबलक साठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. लहान, मोठे प्रकल्प आणि बंधारे ओव्हरफ्लो झाले असून, मोठ्या प्रकल्पांचा जलसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
५३ हजार ७९८ क्विंटल बियाण्यांची मागणी
यंदा रब्बी हंगामातील क्षेत्र वाढण्याचा अंदाज असल्याने कृषी विभागामार्फत नियोजन केले आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बियाण्यांची अडचण येऊ नये, यासाठी रब्बी हंगाम २०२३-०२४ करिता तब्बल ५३ हजार ७९८ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ४१ हजार ६११ क्विंटल सार्वजनिक, तर १२ हजार १८७ क्विंटल खासगी बियाण्यांचा समावेश आहे. तसेच कृषी विभागामार्फत महाबीजकडे ३६ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी केली असून, त्यामध्ये २५ हजार क्विंटल हरभरा बियाण्यांचा समावेश आहे.