अकोला : न्यायालयासमोरील रोडवर दोन गटात ‘राडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:45 AM2018-02-03T00:45:14+5:302018-02-03T00:45:28+5:30
अकोला : जुने शहरातील खैर मोहम्मद प्लॉटमधील एक युवक न्यायालयात साक्ष देण्यासाठी आला असताना न्यायालयासमोरील रोडवर दोन गटात राडा झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा व रामदासपेठ पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक देशी कट्टा, एक जिवंत काडतूस व तीन तलवारी जप्त केल्याची माहिती आहे. या चौघांविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी जमीर खान आझाद खान हा गुरुवारी न्यायालयात साक्ष देण्यासाठी आला असता न्यायालयासमोरील रोडवर शेख इरफान शेख हारुन, इर्शाद खान ऊर्फ शाहरुख, शेख उमर शेख लढ्ढा व एक अल्पवयीन मुलगा तलवार, देशी कट्टा व जिवंत काडतूस घेऊन हजर होते.जमीर खान न्यायालयाच्या रोडवर येताच त्याचा गट व या चार जणांचा गट अमोरासमोर आले.
त्यांच्यात राडा सुरू होताच रामदासपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले; मात्र तोपर्यंत हे दोन्ही गटातील युवक फरार होण्यात यशस्वी झाले. या प्रकरणाची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे व ठाणेदार शैलेश सपकाळ यांना मिळताच त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला.स्थानिक गुन्हे शाखेने सदर चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून देशी कट्टा, जिवंत काडतूस व तलवारी जप्त केल्या, तर रामदासपेठ पोलिसांनीही तलवार जप्त केल्याची माहिती आहे. या चौघांविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात आर्म्स अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे, रामदासपेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ व सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोडगे यांनी केली.