अकोला रेल्वे स्टेशनवर तीन लाखांची रोकड असलेली बॅग केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:44 PM2018-05-09T13:44:10+5:302018-05-09T13:44:10+5:30
काही वेळाने व्यापारी बॅगेचा शोध घेऊ लागला. मात्र आरपीएफने त्याची चौकशी करून बॅग परत करून प्रामाणिकतेचा परिचय दिला.
अकोला - अकोला रेल्वे स्टेशनवर सोमवारी पहाटे साडेपाच वाजता एक व्यापारी नवजीवन एक्स्प्रेसमधून उतरला. फलाट क्रमांक एकवर असलेल्या नळावर तो तोंड धुण्यासाठी थांबला. त्याने हातातील बॅग बाजूला ठेवली. त्यात दोन लाख ९५ हजार रुपये होते. तोंड धुतल्यानंतर आपल्याच तंद्रीत तोंड पुसत बॅग विसरून रेल्वेस्थानकाच्या बाहेर गेला. इतक्याच बेवारस बॅग दिसताच रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी बॅग ताब्यात घेतली. त्यात त्यांना दोन लाख ९५ हजार रुपये दिसून आले. काही वेळाने व्यापारी बॅगेचा शोध घेऊ लागला. मात्र आरपीएफने त्याची चौकशी करून बॅग परत करून प्रामाणिकतेचा परिचय दिला. व्यापाऱ्यालाही त्याचे पैशासहित बॅग मिळाल्याने त्याने आरपीएफ प्रशासनाचे आभार मानले.
वाशिम येथील रजनी चौकातील व्यापारी शेख रशिद शेख मेहमूद यांचा गोट फार्मचा व्यवसाय आहे. बकरीच्या विक्रीसाठी ते नागपूरला गेले होते. रविवारी रात्री ते नवजीवन एक्सप्रेसने अकोल्याला आले. सकाळी साडेपाच वाजता ते फलाट क्रमांक १ वर आले. झोपेतून उठल्याने तोंड धुण्यासाठी नळाजवळ गेले आणि बॅग विसरून निघून गेले होते. बराच वेळानंतर त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी बॅगचा शोध सुरु केला. मात्र गाडीमध्ये बॅग गेली की फलाटावर विसरली हे त्यांना नक्की आठवत नव्हते. घाबरलेलया अवस्थेत फलाटावर धावतपळत आले व बॅग शोधू लागले. मात्र त्यांना बॅग दिसली नाही. अखेर आरपीएफ ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी शेख रशिद शेख मेहमूद यांची चौकशी केली. पैसे कुठून आणले, कशाचे होते, याबद्दल शहानिशा करून पैशाने भरलेली बॅग परत केली.