अकोला : महापालिकेच्या शाळांमध्ये बालवाडीच्या रिक्त पदांसाठी पदभरतीचा घाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:46 AM2018-02-05T00:46:28+5:302018-02-05T00:46:50+5:30
अकोला : महापालिकेच्या शाळांमध्ये ऑगस्ट २0१७ पासून बालवाडीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यासाठी मानधन तत्त्वावर ३३ स्वयंसेविका व ३३ मदतनीस यांची मुलाखत प्रक्रियेदरम्यान निवड करण्यात आली. बालवाडी सुरू होऊन सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला, तरी अद्यापपर्यंतही काही बालवाड्यांवर सेविका तसेच मदतनीस नियुक्त झाल्या नाहीत.
आशिष गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेच्या शाळांमध्ये ऑगस्ट २0१७ पासून बालवाडीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यासाठी मानधन तत्त्वावर ३३ स्वयंसेविका व ३३ मदतनीस यांची मुलाखत प्रक्रियेदरम्यान निवड करण्यात आली. बालवाडी सुरू होऊन सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला, तरी अद्यापपर्यंतही काही बालवाड्यांवर सेविका तसेच मदतनीस नियुक्त झाल्या नाहीत. प्रशासनाने ज्यावेळी मुलाखत प्रक्रिया राबवली होती, त्यामध्ये पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांची रिक्त पदासाठी निवड करणे अपेक्षित असताना, काही वरिष्ठ अधिकार्यांनी नव्याने पदभरतीचा घाट घातला असल्याची माहिती आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत घसरण होत असल्याचे चित्र होते. पटसंख्या कमी झाल्यामुळे तीन वर्षांपूर्वी ५४ शाळांमधून २१ शाळांचे समायोजन करण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३३ शाळा सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ करण्यासोबतच सर्वसामान्य कुटुंबातील चिमुकल्यांना मनपाच्या शाळेत बालवाडी व सेमी इंग्रजी माध्यमाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २0१६-१७ मध्ये बालवाडी व सेमी इंग्रजी माध्यम लागू करण्याचा निर्णय घेतला. ३३ शाळांमध्ये सुरू केलेल्या बालवाडीसाठी ३३ स्वयंसेविका तसेच ३३ मदतनीस यांची पदभरतीद्वारे नियुक्ती केली. प्रशासनाने त्यांना ऑगस्ट २0१७ मध्ये नियुक्ती आदेश दिले होते. यादरम्यान, मनपाच्या अनेक बालवाड्यांवर सेविका तसेच मदतनीस रुजू झाल्याच नसल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी प्रभारी शिक्षणाधिकारी अनिल बिडवे यांना रिक्त पदांवरील सेविका व मदतनीस यांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. शिक्षणाधिकारी बिडवे यांनी मनपा शाळेतील मुख्याध्यापकांना स्वयंसेविका व मदतनीस यांची माहिती मागितली असता अनेक बालवाड्यांवरील पदे रिक्त असल्याचे समोर आले. या रिक्त पदांसाठी उमेदवारांची नव्याने पदभरती करण्याच्या हालचाली मनपातील एका वरिष्ठ अधिकार्याने सुरु केल्याची माहिती आहे. ऑगस्ट २0१७ मध्ये सेविका व मदतनीस यांच्या निवडीसाठी मुलाखत प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यातील पात्र उमेदवारांनाच प्रशासनाने नियुक्त केल्यास आर्थिक गैरव्यहाराला चाप बसू शकतो. तसे न करता पदभरतीचा आग्रह कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.
पात्र उमेदवारांना संधी का नाही?
बालवाडीसाठी प्रशासनाने सेविका, मदतनीस यांच्या रीतसर मुलाखती घेतल्या होत्या. त्यावेळी सुमारे ६00 पेक्षा जास्त महिला उमेदवार दोन्ही पदासाठी पात्र ठरल्या होत्या. त्यावेळी पात्र ठरणार्या महिला उमेदवारांना प्रशासनाने संधी देण्याची गरज आहे.
शिक्षकांच्या बदली प्रकरणात हात ओले!
प्रशासनाने मे २0१७ मध्ये एकाच शाळेवर मागील आठ ते दहा वर्षांपासून ठाण मांडणार्या ७६ शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात ११ शिक्षकांनी अपेक्षित शाळांवर बदल्या करून घेतल्या. या प्रकरणात काही वरिष्ठ अधिकार्यांनी दुकानदारी करीत हात ओले केल्याची माहिती आहे. चालू शैक्षणिक सत्रात शिक्षकांच्या बदल्या करण्याचा प्रताप करणार्या वरिष्ठ अधिकार्याने या प्रकरणाचे सर्व खापर मुख्याध्यापकांवर फोडले, हे येथे उल्लेखनीय. ११ शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे ३३ शाळांवरील कामकाज प्रभावित झाल्याची परिस्थिती आहे.
-