अकोला : इमारतीचा भाग तोडण्यास नकार; मनपाच्या नगर रचना विभागात पाठविले गुंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:32 AM2017-12-30T01:32:03+5:302017-12-30T01:32:13+5:30
अकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणार्या महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक मार्गावरील एका बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचा अतिक्रमित भाग तोडण्यास महापालिकेला साफ नकार दिला आहे. इथपर्यंतच न थांबता मनपाने कोणतीही कारवाई न करावी, यासाठी मनपाच्या नगररचना विभागात चक्क गावगुंड पाठवून दबावतंत्राचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणार्या महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक मार्गावरील एका बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचा अतिक्रमित भाग तोडण्यास महापालिकेला साफ नकार दिला आहे. इथपर्यंतच न थांबता मनपाने कोणतीही कारवाई न करावी, यासाठी मनपाच्या नगररचना विभागात चक्क गावगुंड पाठवून दबावतंत्राचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची भाजपच्या लोकप्रतिनिधींनी गंभीर दखल घेतली असून, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या नेहरू पार्क चौक ते थेट संत तुकाराम चौकपर्यंतच्या डांबरी मार्गाची अतिशय दुरवस्था झाल्याचे लक्षात घेत आमदार गोवर्धन शर्मा यांनी शासनाकडे पाठपुरावा करून सिमेंट रस्त्यासाठी १४ कोटींची निधी मिळविला.
नेहरू पार्क चौक ते महापारेषण कार्यालयापर्यंत रस्त्याचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले. यादरम्यान, महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतचा रस्ता अरुंद असल्यामुळे या ठिकाणी ‘बॉटल नेक’ निर्माण होण्याची शक्यता होती. बॉटल नेक दूर करण्यासाठी रस्त्यालगतच्या मालमत्ताधारकांच्या संमतीने मनपा प्रशासनाने जागा संपादित केली. यामध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस आदी पक्षाच्या नेत्यांसह स्थानिक मालमत्ताधारकांनी पुढाकार घेतल्यामुळेच रस्ता रुंदीकरणाला चालना मिळाली. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या इमारतींचे मोजमाप करून रस्त्याला अडथळा ठरणारा भाग तोडण्याची कारवाई सुरू केली होती. अजय लहाने यांची बदली झाल्यानंतर ही कारवाई जवळपास ठप्पच पडली आहे.
हा प्रकार कमी म्हणून की काय, एका बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचा अतिक्रमित भाग तोडण्यास प्रशासनाला साफ मनाई केली आहे. प्रशासन कारवाई करेल, या विचारातून ‘त्या’ बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेच्या नगररचना विभागात काही गावगुंडांना पाठवून संबंधित अधिकार्यांवर दबावतंत्राचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.
महापौर, सभापतींचे निर्देश विरले हवेत!
महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौकपर्यंतच्या इमारतींचा काही भाग तोडण्याची कारवाई ठप्प पडली आहे. यामुळे रस्ता रुंदीकरणाचे कामही रखडले. हा प्रकार मनपाचे स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी महापौर विजय अग्रवाल यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर महापौर व सभापती यांनी इन्कम टॅक्स चौकात जाऊन इमारतींची पाहणी करीत प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही कारवाई होत नसल्याने महापौर विजय अग्रवाल, सभापती बाळ टाले यांचे निर्देश हवेत विरल्याचे चित्र समोर आले आहे.
मुदत नको, ठोस कारवाईची गरज!
मागील अडीच महिन्यांपासून गोरक्षण रोडवरील मालमत्तांना हटविण्याची थातूरमातूर कारवाई सुरू आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी जाणीवपूर्वक वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. मनपात गावगुंडांना पाठवून दबावतंत्राचा वापर करणार्या बांधकाम व्यावसायिकांना प्रशासनाने आता मुदत देण्यापेक्षा ठोस कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.